नुकसानीचे पंचनामे प्रगतिपथावर, द्राक्ष बागांसह बाजरी, कांदा, ज्वारीचे नुकसान
नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्य़ात अक्षरश: कहर केला असून बुधवारीही तो कायम राहिला. द्राक्ष बागांसह मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्य, कांदा आदी पिकांचे कोटय़वधींचे नुकसान आतापर्यंत झाले आहे. बागलाण तालुक्यात अर्ली द्राक्षांचा हंगाम वाया गेला. इतरत्र वेगळी स्थिती नाही. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. ऐन दिवाळीत कोसळलेल्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. आमदार आणि खासदारांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन दिलासा दिला. नुकसानीचे पंचनामे प्रगतिपथावर असून गुरुवारी प्राथमिक अंदाज हाती येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले बहरले. यामुळे दिवाळी उत्साहात साजरी होईल, अशी स्थिती असताना परतीच्या पावसाने सारे काही उद्ध्वस्त केले. कोणतेही पीक त्यातून वाचले नाही. सततच्या पावसाने शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तयार होण्याच्या मार्गावर असणारे भात पीक आडवे झाले. बाजारात विकायला नेलेला, शेतात काढून ठेवलेला सोयाबीन पावसाच्या तडाख्यात सापडला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा कांद्याचे उळे टाकूनही वाया गेले. ज्यांचे वाचले, त्यांनी लागवड केलेला कांदा परतीच्या पावसाने धुवून काढला. टोमॅटो शेती जमीनदोस्त झाली. लष्करी अळीमुळे आधी पेरणी केलेला मका खराब झाल्यावर अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती. मात्र पावसाने मका पिकाची कणसे काळी पडून त्यांना कोंब फुटले. बाजरी, ज्वारी, नागली, कडधान्य आदींची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन अशा सर्वच पिकांचे वारेमाप नुकसान झाले. पावसामुळे मका, बाजरीचा चाराही सडून गेल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
फळ पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. बागलाण, निफाड, दिंडोरी, सिन्नर, नाशिक आदी तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले. बागलाण तालुक्यात अर्ली द्राक्ष घेतले जातात.
इतरत्र बागा वेगवेगळ्या टप्प्यात होत्या. परंतु, सर्वाचे कमी-अधिक नुकसान झाल्याकडे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी लक्ष वेधले. या स्थितीमुळे कोणी द्राक्ष उत्पादक आज आपली द्राक्ष निर्यात होतील, याची शाश्वती देऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.
कृषी विभागाकडून पंचनाम्याचे काम सुरू झाले असून गुरुवारी प्राथमिक अंदाज येईल. काढणीवर आलेल्या आणि इतर टप्प्यात असणाऱ्या प्रत्येक पिकांस पावसाचा फटका बसला. द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले.
– संजीव पडवळ (जिल्हा कृषी अधिकारी)
