द्राक्ष, बेदाण्याला फटका; अमरावती, यवतमाळमध्ये पुन्हा गारपीट
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांमध्ये रविवारी दुपारी मुसळधार अवकाळी पावसासह गारा पडल्याने कांद्यासह गहू, हरबरा, केळीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. चांदूर बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतमाल भिजून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यात शनिवारी झालेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काल, शनिवारी रात्री वर्धा जिल्ह्य़ातील काही भागात झालेल्या गारपिटीने केळीबागांना झोडपले. नागपुरात सकाळपासूनच आकाश काळवंडलेले होते. सायंकाळी तुरळक सरी पडल्या असून कळमेश्वरसह या परिसरात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला.
सोलापूर, सांगलीतही हजेरी
सांगोला तालुक्यातील खवासपूर येथे पाऊस सुरू असताना वीज पडून हरिदास हगवणे (६५ वर्ष) या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतात उघडय़ावर असलेला कडबा झाकण्यासाठी ते गेले असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला येथे सायंकाळी सहानंतर सुमारे तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते तसेच वातावरणात गारवा निर्माण झाला
होता. शनिवारी रात्री कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने बेदाणानिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जत तालुक्यातील काही भागांत दिवसभराच्या उकाडय़ानंतर सायंकाळी तर कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊस झाला.
नाशिक परिसराला तासभर झोडपले
शहरातील सिडको, पाथर्डी आणि नाशिकरोडच्या काही भागास रविवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. तासभर झालेल्या या पावसामुळे ऐन काढणीस आलेल्या द्राक्ष पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने द्राक्ष बागायतदार हादरले आहेत. पावसामुळे मणी गळून पडण्याचे प्रकार घडले. घडावर शिल्लक राहिलेल्या मण्यांच्या दर्जेदारपणावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.