विद्युत विभागाकडून बिटको रुग्णालयातील वीज व्यवस्थेची तपासणी
नाशिक : नवीन बिटको रुग्णालयातील करोना कक्षात एक व्हेंटिलेटर पेट घेऊन बंद पडले. पाठोपाठ आणखी चार व्हेंटिलेटर बंद पडली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधानता दाखविल्याने चार ते पाच रुग्णांसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करीत उपचार केल्याने अनर्थ टळला. तांत्रिक दोषामुळे नादुरुस्त झालेली ही व्हेंटिलेटर यंत्रे पंतप्रधान काळजी निधीतील असल्याची माहिती उघड झाली आहे. या घटनेनंतर खबरें८४दारीचा उपाय म्हणून मनपा विद्युत विभागाने रुग्णालयाच्या संपूर्ण विद्युत वितरण व्यवस्थेची तपासणी केली.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेची रुग्णालये वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील प्राणवायूच्या टाकीतील व्यवस्थेत गळती होऊन २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. ही घटना ताजी असताना अलीकडेच बिटको रुग्णालयात नगरसेविकेच्या पतीने प्रवेशद्वारावरील काचेला मोटार धडकवत गोंधळ घातला होता. मंगळवारी सायंकाळी व्हेंटिलेटरमध्ये बिघाड होऊन प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. महापालिकेच्या अतिदक्षता विभागात एकूण १६ व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी एक व्हेंटिलेटर तप्त होऊन त्यातून धूर निघाला. त्यामुळे त्यासोबत पाच व्हेंटिलेटर बंद पडले. हे लक्षात आल्यावर डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना इतरत्र प्राणवायू व्यवस्थेवर घेतले. बंद पडलेले पाच व्हेंटिलेटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्याचे मनपा आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
व्हेंटिलेटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे बिघाड झाल्याची शक्यता वर्तविली जात होती. तथापि, ती नाकारली गेली. बिटको रुग्णालयात एकाचवेळी सुमारे ८०० करोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यातील गंभीर रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. या कक्षातील व्हेंटिलेटर सलग २४ तास अविरतपणे सुरू असतात. अधूनमधून काही काळ ती बंद ठेवण्याची गरज असते. तसे होत नसल्याने व्हेंटिलेटर तापून पेटल्याचा निष्कर्ष मनपा विद्युत विभागाने नोंदविला आहे.
अकस्मात पेट घेणारे आणि अन्य असे हे पाचही व्हेंटिलेटर पंतप्रधान काळजी निधीतून रुग्णालयास मिळालेली आहेत. गेल्या वर्षी बिटको रुग्णालयात पंतप्रधान काळजी निधीतून २० आणि या वर्षी ४५ याप्रमाणे एकूण ६५ व्हेंटिलेटर मिळाले असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले. आजपर्यंत या यंत्रात असा काही बिघाड झाला नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली. उपरोक्त घटनेनंतर विद्युत विभागाने रुग्णालयातील संपूर्ण वीज व्यवस्थेची तपासणी करून ती सुस्थितीत असल्याचे नमूद केले.
व्हेंटिलेटरसाठी तज्ज्ञ नाही
रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचा वापर करताना तांत्रिक ज्ञान असलेली व्यक्ती बिटको रुग्णालयात उपलब्ध नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक जगदीश पवार यांनी केला. ‘एक्स रे’ अहवालावरून व्हेंटिलेटरचा कसा, किती प्रमाणात वापर करावा, हे निश्चित होते. तज्ज्ञ नसताना सर्व रुग्णांसाठी एकाच क्षमतेने सरसकट त्यांचा वापर होत असल्याचा आक्षेप पवार यांनी नोंदविला. रुग्णालय व्यवस्थापन काहीही कारणे देऊन वेळ मारून नेण्याचे काम करते. रुग्णालयात मानधनावर सुमारे ३२ डॉक्टर आहेत. सहा महिन्यांपासून त्यांना वेतन दिले गेलेले नाही. यातील एक डॉक्टर वसावे यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांचे भाऊ, वडील यांचेही निधन झाले. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांना काही मदत वा मानधन देण्याचे औदार्य दाखविले गेले नसल्याकडे पवार यंनी लक्ष वेधले. रुग्णालयात केवळ एकच फिजिशियन आहे. एक व्यक्ती ७०० ते ८०० रुग्णांवर कसे उपचार करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.