१५ कोटी रुपये खर्च; अखंड पाषाणातून नऊ हजार टनाची मूर्ती
जवळपास १३ वर्षांचा कालावधी. डोंगरावरील अतिशय अवघड ठिकाणी शेकडो मजूर व डझनभर अभियंते अव्याहतपणे राबलेले. दगडाच्या शोधापासून ते अखंड पाषणातील मूर्ती प्रत्यक्षात येईपर्यंत खर्च झाला तब्बल १५ कोटी रुपये. अनेक आव्हानांवर मात करत दृष्टिपथास आलेल्या मूर्तीचे वजन नऊ हजार टन. बागलाण तालुक्यातील मांगीतुंगीच्या डोंगरावर साकारलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी भव्य मूर्तीच्या निर्मितीचा हा प्रवास विलक्षण आहे.
मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली असली तरी सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या भव्य मूर्तीची निर्मिती कथा थक्क करणारी आहे. जैन समाजाच्या सर्वोच्च साध्वी म्हणून गणल्या जाणाऱ्या ज्ञानमती माता यांनी १९९६ मध्ये मांगीतुंगी येथे ही मूर्ती साकारण्याचा संकल्प सोडला होता. हा संपूर्ण परिसर वन खात्याच्या अखत्यारीत असल्याने पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने २००१ मध्ये या कामास परवानगी दिली. सेलबारी-ढोलबारी पर्वत रांगेतील मांगीतुंगी हा वेगळाच पर्वत. याच ठिकाणी दिगंबर जैन धर्मीयांचे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. साडेचार हजार पायऱ्या चढून गेल्यानंतर अत्यंत प्राचीन लेण्यांत गुरुप्रतिमा व शिलालेख पाहायला मिळतात. देशात सर्वाधिक लेणी महाराष्ट्रात असण्याचे कारण स्थानिक पातळीवरील बेसाल्ट प्रकारच्या दगडात दडलेले आहे. कठीण व नरम दगडांच्या थराच्या या दगडावर नक्षीकाम अथवा मूर्तीकाम करणे सोपे जाते. शिवाय ते चिरकाल टिकते. परवानगीची प्रक्रिया पार पडल्यावर १०८ फुटी अखंड पाषणातील मूर्तीसाठी तसा दगड शोधण्याचे काम सुरू झाले. इतक्या मोठय़ा मूर्तीचे काम महाराष्ट्रात झाले नसल्याने प्रारंभी त्यासाठी परदेशी कंपनीचा विचार झाला. मात्र त्या कंपनीने अखंड दगडाच्या शोधासाठी पर्वताचे स्कॅनिंग करण्यासाठीच दोन ते चार कोटींचा खर्च सांगितल्यामुळे हे काम मांगीतुंगी ट्रस्ट व चंद्रकांत रायगोंडा पाटील (जैन) यांच्याकडे देण्यात आले.
पाटील यांच्याकडे ४० वर्षांचा देशभरात जैन मूर्ती साकारण्याचा अनुभव असूनही भव्य मूर्तीचे काम आव्हानात्मक होते. १०८ फूट मुख्य मूर्ती आणि १३ फुटाचे कमळाचे व्यासपीठ अशा १२१ फूट मूर्तीसाठी त्यांनी दगड शोधण्यासाठी संपूर्ण मांगीतुंगी पर्वत पालथा घातला. अखेर मांगी पर्वतावरील एका शिखरावर तसा दगड सापडला. दगड सापडला, पण सुरुंगाने तो वेगळा करणे धोक्याचे होते. त्यामुळे मूर्तीच्या दगडालाही धक्का लागण्याची शक्यता होती. यावर काय तोडगा काढावा याचा शोध घेत असताना पाटील यांना वायरने दगड कापण्याच्या इटालियन पद्धतीची माहिती मिळाली. ही पद्धत भारतीय वास्तुशास्त्रात वापरली गेल्याचे संदर्भ मिळाले. त्यानंतर त्या अनुषंगाने यंत्र विकसित केले. याद्वारे पर्वतापासून मूर्तीसाठी लागणारा दगड वेगळा करण्यात आला.
दगड फोडण्यासाठी २५० हून अधिक कामगार व डझनभर अभियंते दिवसरात्र राबत होते. पर्वतावर चढून हे काम करावे लागत असल्याने अभियंते अवघड कामात टिकत नव्हते. ही चढाई सोपी नव्हती. दररोज दोरीच्या साहाय्याने शिखरावर जावे लागायचे. यंत्रसामग्री सुटे भाग करून न्यावी लागे. पुढील काळात पायथ्यापासून मूर्तीच्या दगडापर्यंत साधनसामग्री नेण्यासाठी कच्चा रस्ता बनविण्यात आला. या रस्त्यावर साधारण वाहने जाऊ शकणार नसल्याने अधिक क्षमतेच्या वाहनांची व्यवस्था केली गेली. मूर्तीच्या कामाची जबाबदारी सांभाळणारे राजस्थानी मूर्तीकार सूरजमल नाहटा यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र आशीषकुमार यांनी हे काम पुढे नेले.
२०१२ मध्ये कामाला आरंभ
२०१२ मध्ये मूर्तीच्या दगडाला आकार देण्याचे काम सुरू झाले. वरील भागातील काम आधी झाल्यावर खालील भागाचे काम करण्यात आले. अवाढव्य दगड स्थानिक तंत्राच्या साहाय्याने विलग करण्याचे काम अभियंत्यांनी कौशल्यपूर्वक पार पाडले. हळूहळू निश्चित झाल्याप्रमाणे मूर्ती आकारास येऊ लागली आणि नऊ हजार टन वजनाची अखंड पाषाणातील मूर्ती दृष्टिपथास आली. या कामासाठी जैन बांधव, संस्था व संघटनांनी सढळ हस्ते आर्थिक मदत दिली. मूर्ती निर्मितीसाठी तब्बल १५ कोटी रुपये खर्च आल्याची माहिती संयोजक पदाधिकाऱ्यांनी दिली.