पावसाळ्यात वाहने घसरून होणारे अपघात नवीन नाहीत. परंतु, या काळात भरधाव वाहने चालविणे जिवावरही बेतू शकते. गंगापूर रस्त्यावरील होरायझन अकॅडमी समोरील चौकात भरधाव जाणारी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पावसाला सुरूवात झाली की, शहरातील रस्ते खड्डेमय होऊ लागतात. पावसाचा तितका जोर नसल्याने रस्ते खड्डेमय होण्याची स्थिती फारशी निर्माण झालेली नाही. परंतु, रस्ते काहीअंशी जलमय व चिखलमय होत आहे. या स्थितीत सावधगिरीने वाहन चालविणे अनिवार्य ठरते. ही सावधगिरी न बाळगल्यास अनर्थ घडू शकतो. तसा काहिसा प्रकार गंगापूर रस्त्यावरील होरायझन शाळेजवळ घडला. पेठ रोडवरील मायको दवाखान्याजवळ वास्तव्यास असलेला सचिन भिकाजी गायकवाड (२२) हा युवक अ‍ॅक्टीव्हावरून निघाला होता. भरधाव असताना दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि गाडी घसरली. अपघातात त्यास गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळ्यात वाहने घसरण्याचे प्रमाण वाढते. खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकाला तारेवरची कसरत करावी लागते. यातून अपघात वाढतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे वाहनधारकांनी संथ गतीने सुरक्षित वाहन चालविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.