दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात बांधलेल्या दगडी धरणातील पाणी तीन महिन्यांकरीता नवी मुंबईकरांना देण्यात येणार आहे. यासाठी खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मध्य रेल्वेचे महाप्रंबधक यांच्याशी पत्रव्यवहार करून पाणी वापराचा मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार रेल्वेने नवी मुंबई महानगरपालिकेला या धरणातील पाणी तीन महिन्यांकरीता वापरण्याची परवानगी दिली आहे.
दिघा इलठण पाडा येथील ब्रिटीश कालीन धरणातील पाण्याचा वापर रेल्वे आजवर करीत नव्हती. नवी मुंबई महानगरपालिका या धरणातील पाणी मिळण्यात यावे. यासाठी रेल्वेकडे वारंवार पत्रव्यवहार करत होती; पाणी देण्यास रेल्वेने नकार दिला होता. यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांच्याकडे साकडे घातले होते.
रेल्वेने तीन महिन्यासाठी धरणाच्या पाण्याचा उपयोग करण्याची परवानगी नवी मुंबई महानगरपालिकेला दिली आहे, अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी शुक्रवारी केलेल्या पाहणी दौऱ्यात दिली.