भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती सोहळा नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. नवी मुंबई तसेच पनवेलमध्ये गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता आंबेडकर पुतळ्यासमोरून या मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीत चित्ररथ हे मुख्य आकर्षण असणार आहेत. तसेच लेझीम पथकासह ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघेल.
दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात सकाळी १० वाजता आंबेडकरांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन भरले आहे. तसेच या वेळी भारतीय संविधान या विषयावर चर्चासत्र येथे आयोजित केले आहे. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता नाटय़गृहात पुणे येथील व्याख्याते दिलीप काकडे हे ‘देशातील अर्थ, नियोजनातील जल व विद्युत क्षेत्रातील आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर प्रबोधन करतील.
शेवटच्या दिवशी (शनिवारी) नाटय़गृहात सामाजिक विषयांवर रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये पर्यावरण समतोल, लेक व पाणी वाचवा, व्यक्तिचित्रे असे हे स्पर्धेचे विषय आहेत. सकाळी साडेदहा वाजता गायक आदर्श शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पनवेलकरांना अनुभवता येईल. या वेळी पनवेल तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या १२५ जणांचा सत्कार नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2016 रोजी प्रकाशित
नवी मुंबईत आज भीमनामाचा जागर
आंबेडकरांची १२५वी जयंती सोहळा नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-04-2016 at 03:32 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr b r ambedkar 125th birth anniversary to be celebrate in navi mumbai