तळोजा येथील दीपक फर्टिलायझर कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या रमन ट्रॅव्हल्समधील वाहनचालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. अंकुश अप्पासाहेब चव्हाण असे मृताचे नाव असून तो विक्रोळी येथे राहत होता.

हाजीमलंगवाडीजवळील एका निर्जनस्थळी अंकुशचा मृतदेह आढळून आला. या वेळी मृतदेह अर्धा जमिनीत गाडण्यात आला होता. मारेकऱ्यांनी अंकुशचे डोकेही ठेचले होते. याशिवाय त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले होते. अंकुशला पत्नी आणि दोन मुले आहेत.

दीपक फर्टिलायझर्स कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठीचे कंत्राट ठाण्यातील रमण ट्रॅव्हल्स कंपनीकडे आहे. या ट्रॅव्हल्ससाठी अंकुशने स्वत:ची शेवर्ले ही गाडी भाडय़ाने लावली होती. तीन दिवसांपासून अंकुश घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रारी दिली होती. पोलिसांत तो बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. अंकुश रोज सकाळी मुंबईहून दीपक कंपनीच्या अधिकाऱ्यांना कंपनीत घेऊन येत असे, आणि रोज सायंकाळी पाच वाजता अधिकाऱ्यांना घरी सोडण्यासाठी निघत असे; परंतु तीन दिवसांपूर्वी अंकुश दुपारी दोन वाजता कंपनी आवारातून एका अनोळखी व्यक्तीसोबत निघून गेला. त्यानंतर तो घरी परतला नव्हता. दरम्यान, मंगळवारी हजीमलंगवाडीवरील ग्रामस्थांना एक अनोळखी मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत दिसला. याच वेळी मृतदेहापासून काही अंतरावर एक वाहन उलटलेल्या अवस्थेत दिसले. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती हिल लाइन पोलिसांना दिल्यानंतर प्राथमिक तपासानंतर तळोजा पोलिसांत वर्दी दिली. त्यानंतर तळोजा पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली. पोलिसांनी मृतदेहाशेजारील बेवारस गाडीच्या क्रमांकावरून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता हत्येचा उलगडा झाला. चेहऱ्याची ओळख पटू नये यासाठी मारेकऱ्यांनी त्याचे डोके दगडाने ठेचले होते. मारेकऱ्यांनी अंकुशची गाडीही उंच खडकावरून खाली फेकून देण्याचा प्रयत्न केल्याच्या खुणाही घटनास्थळी आढळल्या. दरम्यान, अंकुशला सोबत घेऊन जाणारी ती व्यक्ती कोण होती, हत्या नेमके कोणी व का केली याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांचे पथक करीत आहे.