उरण तालुक्यातील पारंपरिक गावच्या जत्रा आणि यात्रांना बुधवारपासून आरंभ झाला. संपूर्ण दीड महिना जत्रांचा उत्सव चालेल. कोकणात चैत्र महिन्यांत देवीच्या जत्रा आणि यात्रांना सुरुवात होते. त्यांना पालख्यांचीही जोड असते. अनेक गावात दोन दिवसांच्या यात्रा भरतात. शहरांतून भाविक यासाठी येतात.
गावदेवीच्या यात्रांची सुरुवात पुण्यातील कार्लाच्या एकवीरा देवीच्या यात्रेने होते. त्यानंतर गावो गावी असलेल्या गावातील देवीच्या तसेच कुलदैवतांच्या यात्रा भरविण्याची शेकडो वर्षांची परंपरा उरण तालुक्यात आहे. उरणमधील नवीन शेवेमधील शांतादेवी तर जसखारमधील रत्नेश्वरी देवीची यात्रा ही रायगडसह ठाणे व मुंबईतही प्रसिद्ध आहे. दोन दिवस चालणाऱ्या या दोन्ही यात्रांसाठी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित असतात, तर तालुक्यातील बोकडविरा, भेंडखळ,नवघर,पागोटे,कुंडेगाव,करळ,सोनारी,सावरखार,डोंगरी व पाणजे या गावातील जत्रा एकाच दिवशी साजरी केली जाते.त्याचप्रमाणे चिरनेर,पिरकोन,कोप्रोली,वशेणी,आवरे,गोवठणे या गावांनाही यात्रा भरविल्या जातात. यात्रांमध्ये कुलदैवतांच्या यात्रेलाही महत्त्व आहे.
नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने गावाबाहेर राहणारे चाकरमानी या जत्रांना आवर्जून उपस्थित राहतात.या जत्रांमध्ये बकरे,कोंबडय़ाची खरेदी विक्री मोठय़ा प्रमाणावर होत असते, तर जत्रांमधील रोषणाई,आतषबाजी यांचेही खास आकर्षण असते.
त्यामुळे गावातील यात्रांमुळे गावागावात चैतन्याचे वातावरण निर्माण होते.अनेक यात्रांमध्ये गावासाठी मटणाचे नैवेद्य देण्याची प्रथा आहे, तर शासनकाठय़ा उभारूनही यात्रा साजऱ्या केल्या जातात.