नवी मुंबई : वाशी मानखुर्द खाडी पुलावर रेल्वे रूळालगत जखमी अवस्थेत सापडलेल्या युवतीने आठ दिवसांनंतर जबाब दिला असून ती रेल्वेतून तोल गेल्यामुळे पडली असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचा अंदाज वर्तवला होता.
२२ डिसेंबर रोजी ही २५ वर्षीय युवती गंभीर जखमी अवस्थेत वाशी रेल्वे खाडी पुलावर आढळून आली होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास वाशी स्टेशन मास्टर यांनी एक युवती खाडी पुलावर पडलेली आहे अशी माहिती वाशी लोहमार्ग पोलिसांना दिली होती. त्या अनुषंगाने सहाय्य्क पोलीस निरीक्षक एस आर शिंदे यांनी वैद्यकीय पथकासह घटनास्थळी पोहचत बेशुद्ध अवस्थेत तिला वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारार्थ मुंबईतील जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्याशी झटपट झालेली असावी आणि बलात्कार झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. मात्र तिने कोणताही जबाब दिला नव्हता. तिचा चाचणी अहवालही अद्याप आलेला नाही. मात्र २८ डिसेंबर रोजी पोलिसांनी तिची जबाब घेतला. तिने बलात्कार वा मारहाण झाली नाही मी तोल जाऊन पडले, अशी माहिती पोलिसांना दिली. ती वाशी येथे कशी आली, लोकलमध्ये कधी चढली ही माहिती वैयक्तिक असल्याने सांगू शकत नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू के सरकर यांनी सांगितले.