नवी मुंबई : खेळत असताना जमिनीखाली असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना ऐरोलीत घडली आहे. सदर मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

निकिता सिंग (वय ६) असे मृत मुलीचे नाव आहे. सिंग कुटुंबीय ऐरोली सेक्टर ९ येथील राधाकृष्ण सोसायटीत राहत होते. निकिताचे वडील याच ठिकाणी सुरक्षारक्षकाचे काम करतात. १० डिसेंबर रोजी निकिता खेळत असताना बेपत्ता झाली. तिची खूप शोधाशोध केली, मात्र ती आढळून न आल्याने अखेर रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. सीसीटीव्हीचे चित्रीकरणही तपासले, मात्र तिचा शोध लागला नाही. टाकीतही पाहिले मात्र पाणी जास्त असल्याने ती आढळून आली नाही. मंगळवारी पाण्याच्या टाकीतून उग्र वास येत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. टाकीचे झाकण उघडे राहिल्याने ती पडली असावी असा अंदाज असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिली