आगरी कोळी समाजात होलिका मातेला मोठे महत्त्व असल्याने गुरुवारी नवी मुंबईतील विविध आगरी कोळी गावांत होळी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली, पण दिवा गावात चि. सौ. कां. होळीचा चिरंजीव शिमग्याशी धूमधडाक्यात झालेला विवाह एक चर्चेचा विषय ठरला. चार दिवस चाललेल्या या सोहळ्यात आगरी समाजातील सर्व रीतीरिवाज पाळण्यात आले. यात भिंती तांबडण्यापासून ते हळदी सभारंभापर्यंत भोजन व्यवस्थेसह सर्व कार्यक्रमांचा समावेश होता. वरातीसाठी अख्खे गाव सेक्टर नऊच्या मैदानात लोटले होते.
दिवा गावातील एकोपा कायम राहावा, नवीन पिढीला सणाचे महत्त्व कळावे यासाठी व श्री कृष्ण मंडळाला ५० वर्षे झाल्याचे निमित्त साधून होळी आणि शिमगा यांचे लग्न मोठय़ा धूमधडाक्यात लावून देण्यात आले.
एक हजार आमंत्रणपत्रिका छापण्यात आल्या होत्या. ‘श्री रंगलेराव रंगाने रंगले राहणार रंगले गाव, रंगीन शहराची ज्येष्ठ कन्या चि. सौ.कां. होळी हिचा विवाह श्री भिजलेराव पाण्याने भिजले राहणार पाणीपुर ता. जि. धरण यांचा सुपुत्र चिरंजीव शिमगा याच्या बरोबर संपन्न होणार आहे,’ असे नमूद करण्यात आले होते.
सेक्टर नऊ येथील मैदानात मंडप घालून रोषणाई करण्यात आली होती. आगरी समाजात गावात फिरून निमंत्रण देण्याची पद्धत आहे. त्याला भिंती तांबरणे म्हटले जाते. ही बंद पडलेली परंपरा देखील या होळीच्या निमित्ताने पार पाडण्यात आली.
आगरी कोळी समाजात हळदी सभारंभाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. मांसाहर आणि मद्यपान हे याचे वैशिष्टय़. त्यामुळे लग्नाआधी हा सोहळादेखील मोठय़ा धूमधडाक्यात झाला. याच दिवशी गजानन मढवी यांच्या घरातून साखरपुडा मंडळाच्या कार्यालयात आणण्यात आला. मंगलाष्टके झाली आणि विवाह संपन्न झाला. मिरवणूक, नाच, गाणे, दिवस भोजन व्यवस्था, हार तुरे फुले अशा वातावरणात हे आगळे वेगळे लग्न पार पडले.
होळी हे आमचे आराध्य दैवत आहे. तिचे पारंपरिक पद्धतीने लग्न लावण्यासाठी गेले अनेक दिवस मंडळाचे कार्यकर्ते झटत होते. या निमित्ताने चार दिवस गाव एकत्र आले.
– प्रभाकर मढवी, अध्यक्ष, श्री कृष्ण मंडळ, दिवा
