तयार मसाल्याची मोठी बाजारपेठ असतांनाही विविध जातीच्या लाल सुक्या मिरच्या व मसाल्याच्या पदार्थापासून घरगुती मसाला बनविण्याची परंपरा असून यावर्षी किरकोळ बाजारात मिरच्या तसेच मसाल्याच्या पदार्थाची पंधरा टक्क्य़ाची वाढ झालेली आहे.असे असले तरी घरगुती मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्टया मसाल्याच्या पदार्थाच्या उरण बाजारपेठेत गृहीणींकडून जोरदार खरेदी सुरू आहे.त्यामुळे दर वाढलेले असले तरी मागणी मात्र कायम आहे.
पूर्वी मसाल्याचे पदार्थ आणून घरात मसाला तयार करण्यात येत होता.यामध्ये सुधारणा होऊन मसाला गिरणी आल्याने मसाला गिरणीतून तयार करण्याची सुरूवात झाली आहे.
यासाठी बाजारातून मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरच्यांची खरेदी केली जाते.
उरणच्या बाजारात सध्या घरगुती मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या बेडगी,संकेश्वरी,लवंगी,तेजा तसेच गंटूर आदी जातीच्या मिरच्यांची विक्री सुरू आहे. तसेच गरम मसाल्यासाठी लागणारा त्रिफला,ओवा,धणे,काळीमीरी,जिरे.तीळ,राई आणि जावत्री या पदार्थाचीही विक्री केली जात आहे. तरीही मसाला विक्रीत कोणतीही घट झालेली नाही.
बेगडी मिरचीचा प्रति किलोला १७० रूपये,तर संकेश्वर,गंटूर व तेजा या जातीच्या मिरच्यांचा दर १६० रूपये प्रति किलो आहे.तसेच लवंग १०० ग्रॅमचे ९० रूपये,दालचिनी-७०,तेजपत्ता ४० रूपये,त्रिफला-६० रूपये,धणे -१२० रूपये,चक्रफुल -८० रूपये शंभर ग्रॅमचे दर आहेत.सध्या मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरच्या व इतर पदार्था बरोबरच मसाला दळणाचेही दर वाढल्याने घरगुती मसाला तयार करण्यासाठी जास्त होत असल्याचे मत सरिता पाटील या गृहीणीने व्यक्त केले आहे.तर दर वाढले असले तरी घरगुती मसाल्या शिवाय घरगुती जेवणाची लज्जत येत नसल्याने मसाल्याच्या पदार्थाचे १५ टक्क्य़ांनी दर वाढलेले असले तरी ते खरेदी सुरू असल्याची माहिती निवेदिता पाटील यांनी दिली.