वास्तू विनावापर पडून राहणे टाळण्यासाठी महापौरांचा पायंडा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील ज्या वास्तू किंवा सेवा तत्काळ कार्यान्वित होणे शक्य आहे, केवळ त्यांचे उद्घाटन करण्यात येईल, असा नवा पायंडा महापौर जयवंत सुतार यांनी घालून दिला आहे. भव्य-दिव्य वास्तू उभारायच्या, त्यांचे उद्घाटन करायचे आणि तांत्रिक समस्या, सुविधांचा अभाव अशी कारणे देत त्या वापराविनाच ठेवायच्या असे प्रकार महापालिका क्षेत्रात अनेकदा घडतात. हे टाळण्यासाठी यापुढे जिथे तत्काळ सेवा मिळणार आहे, अशाच ठिकाणांच्या उद्घाटनाला वेळ देण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे.

पालिकेतील प्रभागांमध्ये विविध कामे केली जातात. उद्याने, त्यामधील खेळणी, खुली व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल, शौचालये,बसस्थानके, नवीन बसमार्ग, शाळा, पाणी जोडणी, मालमत्ता कर भरणा केंद्र यांसह विविध कामांचा यात समावेश असतो. परंतु अनेकदा छोटीमोठी कामे शिल्लक असताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव किंवा निवडणुका तोंडावर आल्यावर श्रेय लाटण्यासाठी कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला जातो. नियमानुसार महापौरांकडे उद्घाटनासाठी वेळ व परवानगी मागितली जाते. परंतु अनेकदा उद्घाटन झाल्यानंतरही सेवा सुरूच न झाल्याने पालिकेला नामुष्कीला सामोरे जावे लागते. टीकेची झोड उठते.

नुकतेच कोपरखैरणेत एका प्रभागात मंडईच्या इमारतीचे महापौर व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले परंतु मंडई सुरूच झाली नाही. त्यामुळे टीका करण्यात येत होती. या पाश्र्वभूमीवर यापुढे काम पूर्ण झाले असेल आणि सेवा तत्काळ सुरू होणार असेल, तरच महापौरांकडून उद्घाटनाची तारीख दिली जाईल, असे पत्र संबंधित विभागाला देण्यात आले आहे.

निवडणुकांच्या तोंडावर उद्घाटनांचा धडाका

  • नवी मुंबई महापालिकेत विधानसभा व पालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनांचे पेव फुटले होते. कोटय़वधी रुपये खर्च करून नेरुळ, ऐरोली, बेलापूर येथे उभारलेल्या रुग्णालयांच्या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु त्या वेळी फक्त बाह्य़रुग्णसेवाच सुरू करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप या इमारतींचे अनेक मजले वापराविना पडून आहेत.
  • पामबीच मार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ‘फॅक’ सुविधेचे उद्घाटन करण्यात आले, मात्र अद्याप ती सुविधा सुरूच झाली नाही.
  • नेरुळमधील जयदुर्गामाता भाजी मंडई उद्घाटनानंतर धूळ खात पडून आहे. सध्या तिथे गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. सीवूड्समध्ये एका इमारतीत वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन झाल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

पालिकेच्या कोणत्याही वास्तूचे व नागरी सुविधेचे उद्घाटन करण्यापूर्वी त्या वास्तूचे काम १०० टक्के पूर्ण आहे का याची संबंधित विभागाकडून पत्राद्वारे माहिती मागवण्यात येईल. त्या सुविधा उद्घाटनानंतर तात्काळ कार्यान्वित होणार असतील, तरच उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. काम अपूर्ण असताना कोणत्याही वास्तूचे यापुढे उद्घाटन करण्यात येणार नाही. पालिकेची बदनामी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. – जयवंत सुतार, महापौर

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of basic infrastructure in navi mumbai