डीवायएफआय या युवक संघटनेतर्फे शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या शहीददिनी बुधवारी सकाळी १० वाजता रोजगार वाढविण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य व केंद्र सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सरकारी नोकर भरतीवरील बंदी उठविण्याची प्रमुख मागणी या मोर्चात करण्यात येणार आहे. तसेच उरण तालुक्यातील बंदर व औद्योगिक क्षेत्रातील नोकर भरतीत राजकीय नेत्यांच्या होत असलेल्या हस्तक्षेपालाही आळा घालण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती डीवायएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
देशात पंधरा कोटीपेक्षा अधिक तरुणांनी बेरोजगार असल्याची नोंद रोजगार विनिमय केंद्रात केलेली आहे, तर महाराष्ट्रात ही संख्या ४० लाखांच्या आसपास आहे. ज्यांनी अशी नोंद केलेली नाही. अशा बेरोजगारांची संख्या अधिक आहे, तर शेतीवर अवलंबून असलेल्यांची गणनाच केली जात नाही, तर दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असताना सरकारच्या अनेक विभागातील लाखो जागा रिक्त आहेत. यामध्ये नोकर भरती न करता कंत्राटी पद्धतीने सरकारी काम केले जात आहे. त्यामुळे मागास वर्गासाठी आरक्षित असलेल्या जागाही रिक्त आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या पंधरा लाखापेक्षा अधिक जागा रिक्त असून त्या त्वरित भराव्यात, अशी मागणी डीवायएफआय करीत असल्याची माहिती रायगड जिल्हा डीवायएफआयचे सचिव संतोष ठाकूर यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे उरणसारख्या औद्योगिक विभागात तसेच बंदरात रोजगार निर्माण होत आहेत. या ठिकाणी नोकर भरतीचे अधिकार सर्वपक्षीय समितीने घेऊन जागांचे पक्षांच्या ताकदीप्रमाणे वाटप केले आहे.
याचा परिणाम पात्रता असलेल्या येथील स्थानिकाला नोकरीपासून वंचित राहण्यात होत आहे. अशी पद्धत रद्द करून प्रकल्पग्रस्तांमधील पात्रता व गरजवंताना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणीही डीवायएफआयच्या वतीने या मोर्चात करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कासुकर यांनी स्पष्ट केले.