मनाई असूनही कपडे धुतल्याने पाणी दूषित
ठाणे शहराप्रमाणे नवी मुंबईलाही तलावांची देणगी लाभली असून शहरात २५ तलाव आहेत. महानगरपालिकेने ‘तलाव व्हिजन’अंतर्गत १८ तलावांचे सुशोभीकरण केले. गाळ काढणे, गॅबियन भिंत, घाट, निर्माल्य कलश, स्वागत कमान यावर करोडो रुपये खर्च केले, मात्र देखभालीअभावी आता तलाव विद्रूप झाले आहेत. तलावांतील कारंजी बंद पडली आहेत. तलावामध्ये कपडे धुण्यास मनाई असतानाही रहिवासी बिनधास्तपणे कपडे धुतात. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे.
सुरक्षेसाठी लोखंडी पाइप व राजस्थानी दगडांचे नक्षीकाम केलेले ग्रिल्स बसवण्यात आले आहेत. पण यांचा वापर धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी होत आहे. पालिका असे कपडे जाळून टाकते, तरीही हे प्रकार वारंवार होत आहेत.
तलावमध्ये गणपती व देवी विसर्जनासाठी वेगळा भाग तयार करण्यात आला आहे, मात्र तरीही खुल्या तलावातच विसर्जन केले जाते. निर्माल्यही कलशात न टाकता तलावातच टाकले जाते. ते पाण्यावर तरंगतान दिसते. सुरक्षारक्षक नसल्यामुळे लहान मुले बिनधास्तपणे पाण्यात पोहतात. त्यामुळे काही वेळा मुले बुडण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. ऐरोली नाक्यावरील गणपती तलावाला आसपासच्या परिसरातील रहिवाशांनी धोबीघाटच बनवले आहे. प्रवेशद्वारावर कचरा साचला असून पाण्यावर कचरा तरंगतो. प्रवेशद्वार तुटले आहे. पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. बाके तुटली आहेत. दिघा येथील तलावामध्ये कारंजी बसवण्यात आली आहेत. पण ती बंद पडली आहेत. रबाळे येथील राजीव गांधी तलावाच्या काठावरील बाक तुटले आहेत. घणसोली तलावाच्या पदपथावर दुकानदारांनी मोडतोड झालेले सामान ठेवले आहे. तिथे जुगारी पत्ते खेळतात. रात्री मद्यपानही सुरू असते, असे नर्मदा पाटील यांनी सांगितले.आंग्रोळी तलावाच्या बाजूलाही जुगारी पत्ते खेळत बसतात. तलावातील पाण्याची दरुगधी येत आहे. कोपरखरणे तलावामध्येदेखील ग्रिल्स तुटले आहेत. तलावाच्या बाजूने आणि पाण्यातही कचरा साचला आहे. रासायनिक पाणी सोडण्यात येते.
कोटय़वधी रुपये पाण्यात
शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या तलावांच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने २०११-१२ मध्ये पाच कोटी ८५ लाख तर त्यानंतर पाच कोटी २८ लाख रुपये खर्च केले. या व्हिजनवर पालिकेने आतापर्यंत २० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे, मात्र सध्या त्यांची डबकी बनली आहेत.
तलावाच्या कठडय़ांवर टाकलेले कपडे पालिकेला जाळून टाकते, मात्र गैरवापर टाळण्यासाठी सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात येईल. तसेच तलावाच्या बाहेर फलक लावण्यात येऊन नागरिकांना आवाहन करण्यात येईल. नागरिकांनी स्वतची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नमुंमपा
