नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून प्रवांशाना प्रवास सध्या नकोसा झाला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे गाडय़ा बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत, तर कोलमडलेल्या वेळापत्रकाने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. परिवहनच्या गोंधळी कारभाराची तक्रार करण्यासाठी प्रवाशांकरिता कोणतीही यंत्रणा अस्तित्वातच नसल्याने त्यांच्या हालात अधिकच भर पडली आहे. एनएमएमटीच्या विविध आगारांत निरीक्षक नाहीत. त्यामुळे आधीच डबघाईला आलेल्या एनएनएमटीचे चाक समस्यांच्या विळख्यात रुतले आहे.
एनएनएमटीच्या बसेसने मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली अंबरनाथमार्गे बदलापूर व खोपोली या ठिकाणी रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. काही महिन्यांपूर्वी एनएनएमटीने किमान भाडे आणि पुढील अंतरासाठीही भाडय़ात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवांशाचा पारा अधिकच चढला आहे. असे असताना एनएनएमटीच्या गाडय़ांचे वेळापत्रक या सर्वच मार्गावर कोलमडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळीही बस वेळेवर येत नाही आणि जर आल्याच तर एकामागून एक अशा रांगा लागतात. त्यामुळे एक गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली, तर त्यामागच्या सर्व बस पूर्णपणे मोकळ्या असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी नादुरुस्त बसेस रस्त्यावर उतरवल्या जात आहे. त्यामुळे गळक्या बसेसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रासह सर्वत्रच रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे खड्डय़ातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नादुरुस्त आणि जीर्ण झालेल्या एनएनएमटीमधून प्रवास करावा लागत आहे. तर खड्डय़ात बस अडकून बंद पडल्याचे प्रकार सध्या पावसाळ्यात रोजच घडत आहेत.
याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून एनएनएमटीची कोणतीही हेल्पलाइन सुविधा सुरू नसल्याने त्याचबरोबर वाशी, ऐरोली, कोपरखरणे, बेलापूर आदी बस डेपोमध्ये साधे वेळापत्रक न उभारल्याने एनएनएमटीच्या बसची प्रवाशांना चातकासारखी वाट पाहावी लागत आहे. परिवहन प्रशासनाने ‘बस डे’चा उपक्रम हाती घेतल्याचे सांगत शहरात विविध ठिकाणी एनएनएमटीने प्रवास करा आणि सुरक्षित राहा. अशा आशयाचे पथनाटय़ सादर करून प्रसिद्धी मिळवली होती. या वेळी प्रवाशांना तत्पर सेवा देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र ‘बस डे’नंतर त्यातील एकही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवाशांच्या जिवाशी खेळ
दुपारी १२.१० वाजता कल्याण येथून वाशीकडे निघालेली ६० क्रमांकाची (एमएच ४३ एच ५२५५) बस भरपावसात कल्याण फाटय़ाजवळ आल्यानंतर वाहतूक कोंडी नसतानाही चालकाने बस कल्याण फाटा ते महापे मार्गाला जोडणाऱ्या अरुंद रस्त्यावरून बस दामटली. या मार्गावरून कोणतेही जड वाहन चालविण्यास वाहतूक विभागाने मनाई केली आहे. कल्याण फाटय़ावर उभे असलेले वाहतूक पोलीस अशा वाहनांना अटकाव करतात. तरीही एनएमटीच्या चालकाने बस महापेच्या दिशेने नेली. या मार्गावर मोठे प्रमाणावर खड्डे असून, समोरून येणारी वाहने अत्यंत धिम्या गतीने चालवावी लागतात. अशा स्थितीत जड वाहन या रस्त्याने नेत असल्यास अपघाताची शक्यता असते.

कल्याण डोबिवली या मार्गावरील संध्याकाळच्या वेळेला प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र महापे, तुभ्रे पुलाखाली खड्डे असल्याने त्याचा परिणाम एनएनएमटीच्या वेळापत्रकावर होत आहे. या ठिकाणी बसेस वाढवण्याची वांरवार मागणी करूनही परिवहन व्यवस्थापन दाद देत नाहीत.
– सुवर्णा बेले, महिला प्रवासी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmt bus suffered with huge problem
First published on: 03-08-2016 at 01:09 IST