नवी मुंबई : शहरात दिवसेदिवस वाढणाऱ्या करोना रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी पालिका पाच हजार प्राणवायू, ५००अतिदक्षता आणि २०० कृत्रिम श्वसनयंत्रणा खाटा नव्याने तयार करीत आहे. त्यासाठी वेगळया जागांचा शोध घेतला जात आहे. तुर्भे येथील एका धार्मिक संस्थेने भाडेतत्त्वावर घेतलेली गोदामाची जागा ताब्यात घेतली जाणार आहे.
रुग्णांसाठी वैद्यकिय सुविद्या उभारण्यावर नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी भर दिला असून त्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय व सिडको प्र्दशन केंद्रात यापूर्वी प्राणवायू, कृत्रिम श्वसनयंत्रणेची सुविधा उभारल्या आहेत. मात्र, अत्यवस्थ रुग्णांसाठी खाटा अपुऱ्या पडत आहेत. काही खासगी रुग्णालयांना करोना रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, त्यातील ६० टक्के खाटा या शहराबाहेरील रुग्णांनी भरलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून आयुक्तांनी थेट प्राणवायूचा पुरवठा करू शकतील अशा पाच हजार खाटा आणि ५०० अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होतील, अशी व्यवस्था उभी करण्यास सुरुवात केली आहे.
यात केवळ कृत्रिम श्वसनयंत्रणेची सुविधा असलेल्या २०० खाटा उभारल्या जाणार आहेत. सिडकोच्या प्रदर्शनी केंद्रात उभारलेल्या कोविड काळजी केंद्रात प्राणवायू आणि सुविधा उभारण्यात येत आहे.
सानपाडा येथे एमजीएम रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. याशिवाय नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयातही अतिरिक्त सुविधा उभारण्यात येणार आहेत. शहरातील काही मोकळ्या जागांसाठी या सुविधा उभारण्यासाठी वापर केला जाणार आहे. तुर्भे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची एक रिक्त जागा उपयोगासाठी देण्यात आली आहे. त्या ठिकाणीही रुग्णासाठी वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी ताब्यात घेतली जाणार आहे. यासंर्दभात अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्याशी संर्पक साधला असता ते एका बैठकीत व्यग्र असल्याचे सांगण्यात आले.
