पनवेल येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगार बांधकामास एक वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. बांधकाम रखडल्याने नवीन पनवेल येथील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठांनी महामंडळाच्या अनागोंदी कारभाराविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे. तसे पत्र संघाने आगार व्यवस्थापकांना दिले आहे. पावसाळ्यात पनवेल आगाराची अवस्था दयनीय होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांसाठी या आगारात वावरणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे बांधकामास तातडीने सुरुवात करण्यची मागणी यात करण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल बस आगारात दिवसाला ५० हजार प्रवासी असतात. त्यांना येथील गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आगारातील काँक्रीटीकरणाचे काम रखडले आहे. आगार उभारणीचा कोणताही आराखडा येथे लावण्यात आलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी कामाला आरंभ केला जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु अद्याप कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही. आगारात रोज ८ हजार बसगाडय़ांची येजा होते. दररोज ६ लाखांवर म्हणजेच महिन्याला सूमारे २४ कोटी रुपयांचे उत्पन्न प्रवाशांच्या तिकीट भाडय़ातून महामंडळाला होते. बस आगारामध्ये वाहक-चालक व इतर कर्मचारी असे साडेपाचशे कर्मचारी या आगारात काम करतात. प्रवाशांना दुरवस्थेचा फटका सहन करावा लागतो.