तळोजात वसाहतीतील घराच्या छताचा स्लॅब कोसळल्याने जवान जखमी

संतोष सावंत, लोकसत्ता

पनवेल : आगीच्या घटनांमध्ये प्रसंगी जीव धोक्यात घालून बचावाचे कार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे जीवित सध्या सुरक्षित नसल्याचे तळोजातील एका घटनेने स्पष्ट झाले आहे. मंगळवारी सायंकाळी तळोजा औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या जवानांसाठी असलेल्या वसाहतीतील छताचा स्लॅबचा काही भाग महेंद्र सुतार यांच्या अंगावर कोसळला. या ते जखमी झाले आहेत, तर त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा या घटनेतून थोडक्यात बचावला आहे. स्लॅबचा भाग त्यांच्या मुलावर कोसळण्याआधी सुतार यांनी त्याच्या दिशेने झेपावत त्याला दूर सारले आणि त्यांच्या अंगावर स्लॅबचा भाग येऊन कोसळला. यात सुतार यांच्या पाय आणि पाठीला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

तळोजा अग्निशमन दलाच्या वसाहतीत १७ कुटुंबे राहतात. या वसाहतीत राहणाऱ्या जवानांची घरे जीर्ण अवस्थेत आहेत. त्यात औद्योगिक विकास महामंडळाने या इमारतींची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्वच जवानांच्या कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन दिवस कंठावे लागत आहेत. वसाहतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव अनेकदा औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आला आहे. त्याच वेळी इमारतींचे स्थापत्यविषयक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याची मागणी करण्यात आली आहे. जुनी वसाहत पाडून त्या जागी नव्याने इमारती उभारण्याचा मुद्दाही मांडण्यात आला आहे. मात्र प्रस्ताव, सूचना आणि मंजुरी या तांत्रिकतेत वसाहतीचा प्रश्न अडकल्याचे कळते. जवानांच्या वसाहतीवरून उद्योजकांनीही मुद्दे उपस्थित केले.

‘हे तर नित्याचेच’

वसाहतीतील काही घरांमध्ये स्लॅब कोसळण्याच्या किरकोळ घटना घडतात. काहींना तर त्याची आता सवयच झाली आहे, अशी धक्कादायक प्रतिक्रिया एका जवानाच्या कुटुंबीयांनी दिली. आगीच्या अनेक घटनांत जोखीम पत्करणे हे  अग्निशमन दलाच्या जवानांचे कर्तव्यच आहे. पण कर्तव्यावर जाताना घरात कुटुंबीय असुरक्षित असतील तर काय, असा सवाल केला जात आहे.

सहा महिन्यांपूर्वीच इमारत दुरुस्तीच्या कामांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे. करोनाकाळात प्रक्रिया लांबली आहे. तरीही तातडीने निविदा काढून स्थापत्यविषयक परीक्षण आणि दुरुस्ती हाती घेतली जाईल.

– दीपक बोबडे-पाटील, उपअभियंता एमआयडीसी