कामे वेळेत करण्याचे पेट्रोलियम मंत्र्यांचे ओएनजीसीला आदेश

उरण नगरपालिकेच्या पाइपने घरगुती गॅसपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. सोमवारी या प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी भाषणादरम्यानच त्यांनी उरणच्या ओएनजीसी प्रकल्प अधिकाऱ्याला याविषयी विचारणा केली. तसेच प्रकल्पाच्या सामाजिक सुरक्षा निधी (सीएसआर)मधून होणाऱ्या कामांना देखील त्वरित मान्यता देण्याचे आदेश दिले.उरणमध्ये अरबी समुद्रातील बॉम्बे हाय येथे कच्च्या तेलावर प्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण तसेच त्या पदार्थाचे वर्गीकरण केले जाते. या प्रकल्पासाठी १९७५साली येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. हे प्रकल्पग्रस्त आजतागायत कायमस्वरूपी कंत्राटी कामगार म्हणूनच काम करीत आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत यावेळी पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे पिरवाडी समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण करून पर्यटकांची सोय करण्याची मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. या संदर्भात देखील ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार देखील या नेत्यांनी केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी स्थानिकांशी निगडित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांना दिले.