रिक्षाचालकाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना घणसोली येथे उघडकीस आली आहे. वसंत खंडागळे (३८) असे मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी घणसोली सेक्टर-२ मधील विहिरीत खंडागळे यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात कोपरखरणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
खंडागळे हे कोपरखरणे सेक्टर ५ मध्ये कुटुंबासह राहत होते. शनिवारी रात्री ११.३०च्या सुमारास खंडागळे घरी परतत असताना, अज्ञात व्यक्तीने फोन करून शिळफाटा येथील रिक्षाभाडे असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्यानुसार खंडागळे तेथे गेले. भाडे असल्याने रात्री घरी येण्यास उशीर होईल, असे खंडागळे यांनी पत्नीला सांगितले; मात्र सकाळपर्यंत ते घरी न परतल्याने पत्नीने शोधाशोध सुरू केली असता खंडागळे यांचा मृतदेह घणसोली सेक्टर २मधील विहिरीत आढळून आला.
खंडागळे यांच्या गळय़ाभोवती प्लास्टिकची पट्टी करकचून आवळलेली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. शवविच्छेदन अहवालात खंडागळे यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडागळे यांच्या मालकीची रिक्षा अद्याप सापडलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, खंडागळे यांच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यादृष्टीनेही तपास केला जाईल, असेही या वेळी तपास अधिकाऱ्यांनी बोलताना स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2016 रोजी प्रकाशित
रिक्षाचालकाची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला
रिक्षाचालकाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना घणसोली येथे उघडकीस आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-04-2016 at 03:12 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw driver killed and bodies thrown into the well