संस्कृती आणि परंपरा या पूर्वापार सुरू आहेत. परंतु काही ठिकाणी चंगळवादी संस्कृतीने संवेदनशील परिस्थितीवरही मात केल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे. या दिवसकार्याच्या दिवसांत बडेजाव मिरवण्याचा प्रकार वाढीस लागला असून या विरोधात अनिष्ट रूढीपरंपरा संस्था जनजागरण मोहीम हाती घेणार आहे.
कोणा एका व्यक्तीचे निधन झाले तर त्या व्यक्तीच्या दु:खी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांचे सख्खे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट हे त्याच्या घरी जात असतात, जातात. ही पूर्वापार परंपरा आजही सुरू आहे. अनेक ठिकाणी तर बारा ते पंधरा दिवस त्या दु:खी कुटुंबीयांच्या घरात अन्न शिजवले जात नाही. त्यामुळे त्यांचे इतर नातेवाईकांनी शिजविलेले अन्न दिले जाते. याच दिवसांत सांत्वन करण्यासाठी येणारे साखर आणि चहा पावडर आणीत होते. त्याचप्रमाणे दु:ख असल्याने दुधाचा चहा न करता दुधाविनाच चहा दिला जात असे अशा अनेक प्रथा आजही अनेक ठिकाणी सुरू आहेत. यामध्ये दिवसकार्याच्या दिवशी १० ते १२ दिवस दुखवटा जाहीर करण्यात येत असत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बारा ते तेरा दिवस घरात दु:ख करून बसून राहणे अनेकांना सोयीचे नाही. त्यामुळे दु:खाचे दिवस कमी करून अनेकजण तीन दिवसांचाच दुखवटा जाहीर करून आपापली नेहमीची कामे पुन्हा सुरू करत आहेत. त्यामुळे ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी समाजातील समाजसेवकांनी जनजागृती केल्यानंतर ही प्रथा हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. उरणमध्ये याची सुरुवात ज्येष्ठ समाजसेवक नाना पाटील यांच्या कुटुंबाने केली आहे. असे असले तरी दुखवटा जाहीर करणे, चहापान करणे ही पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांमुळे दु:खी कुटुंबाला आधार मिळत असे, असे मत ज्येष्ठ नागरिक आनंद पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सध्या नवी मुंबई, उरण व पनवेल परिसरात मोठय़ा प्रमाणात जमीन विक्रीत अनेकजण धनदांडगे झाल्याने या दु:खाच्या काळातही त्यांनी आपला बडेजाव दाखविण्याची स्पर्धा सुरू केली असून किमती वस्तू, महागडी मिठाई देण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. सांत्वन करण्यासाठी जाणारी मंडळी व दु:खी घरातूनही साखर व चहा पावडर ऐवजी थंडा देऊ लागले आहेत. त्यामुळे समाज सुधारतोय की अधोगतीकडे चालला आहे. याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. परंपरा टिकविण्यासाठी या संदर्भात जनजागृती करणार असल्याचे अनिष्ट रूढीपरंपरांविरोधी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी व्यक्त केले आहे.