रायगड तसेच ठाणे जिल्ह्य़ात विवाहाच्या आदल्या दिवशी हळद व मांडव प्रथा असून या दिवशी शेकडो किलो चिकन, मटन आणि उंची दारू, बँडबाजा आणि जेवणावळींवर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. दारू,मटनाच्या प्रथेमुळे अनेक ठिकाणी हाणामारी झाल्याने तरुणांना जीवाला मुकावे लागले आहे. ही प्रथा बंद करून एका दिवसात साध्या पद्धतीने कमी खर्चात लग्न करून तरुणांनी आदर्श घालून द्यावा, यासाठी उरणमधील अनेक गावांतून पत्रक काढून विवाह इच्छुकांना आवाहन केले जात आहे. असे असले तरी सध्या हळदी मांडवाच्या खर्चाच्या बरोबरीने साखरपुडय़ाच्या सोहळ्यावरील खर्चात वाढ झाली आहे.
हळदी समारंभ हा खाजगी समारंभ म्हणून परंपरेने साजरा केला जात होता. या समारंभाला वधू वराकडील मोजकीच मंडळी उपस्थित असायची अशी माहिती ज्येष्ठ देतात. त्यावेळी आप्तेष्टांना आपल्या ऐपतीनुसार मासळी आणून त्याचे जेवण दिले जात असे. त्यामुळे अधिक खर्च न होता मांडव प्रथा साजरी केली जात होती.
सध्या मांडव(हळदी)साठी दीडदोनशे किलोपेक्षा अधिक मटन, मटन न खाणाऱ्यांसाठी खास चिकनचा बेत तसेच खास मंडळीकरिता विशेष प्रकारची महागडी मासळी तसेच देशी विदेशी विविध प्रकारची दारू याची रेलचेल असते. याच खातीरदारीवर लाखो रुपयांची उधळण केली जाते. त्याचप्रमाणे सध्या एका रात्रीचे हजारो रुपये घेणाऱ्या व कर्कश आवाजाच्या डीजेचीही सोय असते. त्यामुळे या समारंभाला अनेकदा लग्न समारंभापेक्षा अधिक अनाठायी खर्च केला जातो.
अनेक गावांनी लग्नाच्या आदल्या दिवशीची मांडव प्रथाच अनेक वर्षांपासून बंद केलेली आहे. त्यामुळे येथील गरीबांना दिलासा मिळालेला आहे. केवळ लग्नावरच खर्च आणि तोही आपल्या ऐपतीप्रमाणे करीत असल्याने गरीब कर्जाच्या ओझ्याखाली राहत नाही. मात्र सध्या या परिसरात आलेल्या औद्योगिकीकरणामुळे सुबत्ता आली आहे. त्यामुळे अनेकांकडे पैसा आला आहे.तो अशाच लग्नाच्या वेळी खर्च केला जातो.दिमाखदार लग्न ही श्रीमंतांकडे पाहूनच केली जातात. त्यामुळे उरणसारख्या छोटय़ा तालुक्यातही लग्नाला दोन किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी सध्या लाखो रुपये मोजून हेलिकॉप्टरने नवरदेव जातो आहे. या खर्चीक प्रथेविरोधात दोन मराठी नाटकांद्वारेही प्रबोधन केले जात आहे. मात्र गावागावातील तरुणांनी याची दखल घेऊन ही खर्चीक प्रथा बंद करावी असा आमचा प्रयत्न असल्याचे मत भेंडखळ येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रविलास घरत यांनी व्यक्त केले आहे.