परीक्षा नियंत्रकांचा अधिसभेतच राजीनामा
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू अप्पाराव पोडिले यांच्या अटकेची मागणी करीत निदर्शने केली नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कोठडी दिली आहे.
दुसऱ्या एका घटनेत परीक्षा नियंत्रक व्ही.कृष्णा यांनी निदर्शक विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून पदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्याआधी अधिसभेच्या बैठकीतून सभात्याग केला.
‘सोशल जस्टीस फॉर एचसीयू समिती’ने ‘चलो एचसीयू’ची हाक दिली होती. त्यात कुलगुरू अप्पाराव पोडिले यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विद्यार्थी प्रवेशद्वारावर जमले. काही विद्यार्थी प्रवेशद्वारावर चढले. तेथे पोलिस बंदोबस्त असतानाही त्यांनी हे कृत्य केल्याने त्यांना रोखण्यात आले. विद्यार्थ्यांनी अप्पाराव यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व त्यांना विद्यापीठ सोडण्यास सांगितले.
राव यांच्यावर रोहित वेमुला या विद्यार्थ्यांस आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असून ते ७६ वी अधिसभा बैठक कशी बोलावू शकतात, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. विद्यार्थी, राजकीय संघटना यांनी एकत्र येऊन विद्यापीठाविरोधात निषेध करावा, असे आवाहन करण्यात आले होते. विद्यापीठ प्रशासनाने नाकाबंदी केली असतानाही विद्यार्थी तेथे घुसले. २३ मार्चला विद्यापीठाने असा निर्णय घेतला होता, की बाहेरील विद्यार्थ्यांना आवारात प्रवेश द्यायचा नाही. जानेवारीत वेमुला या दलित संशोधक विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यानंतर हैदराबाद विद्यापीठात अजून परिस्थिती धुमसत असून अप्पाराव यांच्या विरोधात मोहीम तीव्र झाली आहे.
जेएसी या संघटनेने म्हटले आहे, की मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पाठवलेल्या दोन सदस्यीय पथकाने कुलगुरूंवर वेमुला आत्महत्या प्रकरणी ठपका ठेवला असून न्यायिक चौकशी सुरू असताना अप्पाराव यांनी पदावर राहणे चुकीचे आहे कारण त्यामुळे चौकशी प्रक्रियेत फेरफार होऊ शकतात.