नवी मुंबईला १८ वर्षांत प्रथमच पाणीटंचाईची तीव्र झळ सोसावी लागत आहे. यातच जुईनगर, सेक्टर २३ मधील नागरी भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कंत्राटदाराच्या बेफिकिरीमुळे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने रहिवाशांना टंचाईमध्ये आणखी हाल सोसावे लागणार आहेत. जुईनगरमधील सेक्टर २३ मधील जलवाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने जोडणी तुटली. पाणी विभागाला या परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यावर तब्बल एक तासाने पाणीपुरवठा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाहून रस्त्यावर आल्याने या प्रभागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांचा संताप वाढत गेल्यावर अखेर कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे आणि स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.