पाणीटंचाईमुळे शहरातील नागरिकांना दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेने त्यातही कपात करून आता एक वेळच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने दिवसेंदिवस नवी मुंबईतील पाणीटंचाई भीषण होऊ लागली असून शहरातील २०० उद्यानातील चांगली वृक्षसंपदा जळून खाक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिका या उद्यानांना एकत्रित सांडपाणी केंद्रातील प्रक्रियायुक्त पाणी देणार होती पण त्याबाबत अद्याप ठणठणाट आहे.

बारा लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईत कधी नव्हे, अशी पाणी आणीबाणी तयार झाली आहे. शहराला सध्या तीनशे दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज केला जात आहे. त्यात आता आणखी वीस दशलक्ष लिटर पाणी कपात झाली असून पुढील दोन महिने तर आणखी कपात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीतील नागरी व औद्योगिक भागात तर पाणी कडी-कुलपात ठेवण्याची वेळ आली आहे.

या भागात पाण्यावर वरून भांडणे होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पिण्याच्या पाण्याची अशी मारामार सुरू झाली असताना सिडकोने शहरात विकसित केलेले पूर्वीचे ९५ आणि पालिकेने मागील वीस वर्षांत केलेले सव्वाशे अशा २१६ उद्यानातील वृक्षसंपदेला पाणीपुरवठा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पालिकेने नैसर्गिक स्रोताचा वापर करताना तलाव, कूपनलिका, आणि विहिरीचा आधार घ्यावा, असे सुचविले जात आहे पण या नैसर्गिक स्रोताकडे यापूर्वी गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्यांची स्थिती वाईट आहे.

टँकरची आवश्यकता

उद्यान, गतिरोधकापर्यंत पाण्याची वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या टँकरची उपाययोजना न केल्यानेही मोठय़ा कष्टाने जगविण्यात आलेली झाडे नष्ट होण्याची शक्यता आहे. जनतेला पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी पार पाडताना पालिकेला या झाडांचीही तेवढीच काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वृक्षप्रेमी व्यक्त करीत आहेत. पालिकेने १६ उद्यानांना पाणीपुरवठा करण्याची तयारी केली आहे पण इतर २०० उद्यानांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.