मेंदूतील डोपामाइन हे रसायन कंपवात किंवा पाíकन्सन डिसीज या आजाराशीदेखील संबंधित आहे. लंडन येथील डॉ. जेम्स पाíकन्सन यांनी १८१७ मध्ये या आजारावर प्रबंध प्रसिद्ध केला त्यानंतर हा आजार त्यांच्याच नावाने ओळखला जाऊ लागला. जैविक मेंदूतील ठरावीक भागातील डोपामाइन कमी झाल्याने हा आजार होतो हा शोध लावणाऱ्या अव्‍‌र्हिड कार्लासन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. १९६७ मध्ये त्यावरील औषध वापरले जाऊ लागले, ज्यामुळे या आजाराच्या रुग्णांचे जगणे थोडेसे सुसह्य झाले. आजही हा आजार पूर्णत: बरा होत नाही. त्यावरील औषधे आयुष्यभर रोज घ्यावी लागतात. या आजारात कंप किंवा हालचाली नीट न करता येणे अशी लक्षणे दिसतात. त्यासोबत उदासी आणि चिंताही असते. औषधांसोबत योग आणि ध्यान यांचा उपयोग केला तर मानसिक लक्षणे कमी होऊ शकतात असे विविध संशोधनांत दिसत आहे. अमेरिका आणि बेल्जियममध्ये माइंडफुलनेस मेडिटेशनचा परिणाम पाहणारे अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत. त् यामध्ये ‘सजगता वाढली की चिंता आणि औदासीन्य कमी होते; मात्र शारीरिक लक्षणांवर फारसा परिणाम दिसून येत नाही’ असे आढळले आहे. ध्यानाच्या जोडीला सजगतेने केलेल्या शरीराच्या हालचालींची जोड दिली तर अधिक फायदा जाणवतो असे अन्य अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

संगीत ध्यान, स्नायू शिथिलीकरण आणि कल्पनादर्शन ध्यानाचा या रुग्णांवर कोणता परिणाम होतो याचेही संशोधन अनेक ठिकाणी होत आहे. त्यामध्ये असे दिसून येते आहे की, कल्पनादर्शन ध्यान हे शारीरिक लक्षणे म्हणजे कंप कमी करण्यासाठी सर्वाधिक परिणामकारक आहे. स्वत:च्या हालचाली अधिक सफाईदार होत आहेत असे दृश्य कल्पना करून पुन्हापुन्हा पाहिले तर नंतरचा अर्धा तास शरीराचा कंप कमी होतो असे निष्कर्ष आहेत.

या विविध ध्यानप्रकारांचा उपयोग करून केली जाणारी सत्त्वावजय चिकित्सा कंपवात रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त होते का, याचे संशोधन भारतातही मोठय़ा प्रमाणात होण्याची गरज आहे.या चिकित्सेचा उपयोग रुग्णांना किती होतो हे सिद्ध झालेले नसले तरी, त्या रुग्णाची काळजी घेणारे नातेवाईकही मानसिक तणावाखाली असतात; त्यांचा तणाव आणि त्यामुळे त्यांच्या शरीर-मनावर होणारे दुष्परिणाम ध्यानाच्या सरावाने नक्की कमी होऊ शकतात. – डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com