समुपदेशन हा विशेष प्रकारचा संवाद असतो. कोणत्याही संवादात माहितीची आणि भावनांची देवाणघेवाण होत असते. माहिती शब्दात सांगता येते पण भावना देहबोलीतून व्यक्त होत असतात. कोणताही संवाद परिणामकारक होण्यासाठी देहबोली समजून घेणे महत्त्वाचे असते. भावना चेहऱ्यावर आणि आवाजातून व्यक्त होतात. समोरील व्यक्ती बोलताना डोळ्याला डोळे भिडवते की नाही याचे काही अर्थ लावले जातात. देहबोलीवरून आपण जो अर्थ लावतो तो अंदाजच असतो, आपल्याला जे वाटते तेच नेहमी खरे असते असे नाही. डोळ्याला डोळे म्हणजे आय काँटॅक्ट न ठेवण्याची अनेक कारणे असू शकतात. न्यूनगंड असणे, लाज वाटणे, काहीतरी लपवणे, जवळीक टाळणे अशा अनेक कारणांतून नजर दुसरीकडे ठेवून माणसे बोलतात. काहीजणांना वरती किंवा खाली पाहत बोलण्याची सवय असते. त्यामुळे नजर देत नाही म्हणजे समोरील व्यक्ती खोटेच बोलते आहे असा एकच अर्थ घेऊन चालत नाही. देहबोलीवरून काही अंदाज बांधता येतात आणि नंतर आनुषंगिक प्रश्न विचारून त्याची खातरजमा करावी लागते. कोणताही संवाद परिणामकारक होण्यासाठी अशी खातरजमा करणे आवश्यक असते. कारण संवादात आपण काय देतो ते महत्त्वाचे नसून समोरील व्यक्ती त्याचा काय अर्थ घेते ते महत्त्वाचे असते’. कम्युनिकेशन इज नॉट व्हॉट इज सेंट बट व्हॉट इज रिसीव्ह्ड’. त्यासाठी ‘मला तुझ्या बोलण्यातून हे कळले आहे, तेच तुला म्हणायचे आहे ना’ किंवा ‘मी जे काही सांगितले ते तुला काय कळले, तू तुझ्या शब्दात सांगशील का’ असे पुन्हा विचारणे आवश्यक असते. समुपदेशकाने असे करणे आवश्यक असतेच, पण कोणत्याही संवादात असे विचारायची सवय लावून घेतली तर बरेच गैरसमज टाळता येतात. आपण असे विचारू लागतो त्या वेळी लक्षात येते की आपल्याला जे सांगायचे असते तेच समोरच्याला समजलेले असते असे नाही. त्याने वेगळाच अर्थ लावलेला असू शकतो. त्यामुळे ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ हे गाणे चांगले असले तरी शब्दावाचून जे कळले असे आपल्याला वाटते ते नेहमी सत्य असतेच असे नाही याचे भान ठेवावे लागते. प्रेमात डोळ्यांच्या भाषेने बरेच काही सांगितले जात असले तरी त्यामधून गैरसमजदेखील होऊ शकतात. पुन्हा प्रश्न विचारून खात्री करून घेतल्याने ते टाळता येतात. – डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com