‘मी मेंदूचे ऐकायचे की हृदयाचे?’ असा बऱ्याच तरुणांचा प्रश्न असतो. हे समजून घ्यायला हवे की ‘दिल’ म्हणजे हृदय हे विचार तयार करीत नाही, विचार आणि भावना मेंदूतच निर्माण होतात. भावनांचा हृदयावर सर्वाधिक आणि लगेच परिणाम होतो त्यामुळे हृदय म्हणजे भावना आणि मेंदू म्हणजे विचार असे मानले जाते. वरील प्रश्नाचा अर्थ भावनांना महत्त्व द्यायचे की तर्कशुद्ध विचाराला असा असतो. कोणताही निर्णय घेताना असा प्रश्न उभा राहतो त्यावेळी त्या निर्णयाचे परिणाम कोणकोणते होतील याचा नीट विचार करून निर्णय घेणे योग्य असते. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेक वेळेला पश्चात्ताप करायला भाग पाडतात. हे प्रेम या भावनेविषयी खरे आहे तसेच कंटाळा या भावनेविषयीसुद्धा आहे. पशांची गरज असूनदेखील ‘कंटाळा आला’ म्हणून सहा महिन्यांत नोकरी सोडणारे अनेक जण भेटतात. नोकरी सोडण्यात, धोका पत्करण्यात चुकीचे काहीच नाही; पण नोकरी सोडल्यानंतर नक्की काय करायचे आहे याचे कोणतेही नियोजन नसताना असे निर्णय नंतर औदासीन्य आणू शकतात. मनात येते ते प्रत्येक वेळी योग्य असतेच असे नाही हे समजून घ्यायला हवे. लग्न झाल्यानंतर प्रेम वाटत नाही म्हणून शारीरिक संबंध न ठेवणारे अनेक जण आहेत. असे वागताना आपण जोडीदारावर अन्याय करतो आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही. विचार माणसाला बोलते करतो आणि भावना चालते करते. सर्व भावना या कोणत्या तरी कृतीला प्रेरणा देणाऱ्या असतात. पण ती कृती प्रत्येक वेळी योग्य असेलच असे नाही. म्हणूनच साक्षीभाव ठेवून मनातील भावना पाहण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक असते. आज व्यायाम करण्याचा माझ्या मनात कंटाळा आहे तरीदेखील मी व्यायाम करणार आहे असे ठरवून आपण कृती केली तरच आपण जे संकल्प केलेले असतात ते पूर्ण होतात. मनाच्या लहरीनुसार वागणे योग्य नसते, कारण त्या लहरी बदलत असतात. प्रेमविवाह केल्यानंतरही प्रेम तसेच राहते असे नाही. दूर असताना वाटणारे आकर्षण जवळ आलो की राहात नाही. हे जोडीदार, नोकरी, गाडी, स्मार्टफोन या सर्वच बाबतीत खरे असते. त्यामुळे निर्णय घेताना भावना विचारात घ्यायला हव्यात, मात्र भावनेच्या आहारी जाता नये. मनात भावनावेग असेल त्यावेळी शरीरावर लक्ष नेण्याचा नियमित सराव केला की हे शक्य होते.
– डॉ. यश वेलणकर
yashwel@gmail.com