‘मानवकेंद्रित मानसशास्त्र’ म्हणजे ह्यूमनिस्टिक सायकॉलॉजीमध्ये स्वप्रतिमा आणि आत्मसन्मान या संकल्पना महत्त्वाच्या असतात. प्रत्येकाच्या मनात स्वत:विषयी एक प्रतिमा असते. स्वत:चे शरीर, बुद्धी, कौशल्ये यांविषयी जे समज स्वत:च्या मनात असतात त्याला स्वप्रतिमा म्हणतात. लहान असताना स्वप्रतिमा इतरांकडून मिळणारी वागणूक आणि कॉमेंटनुसार घडत जाते. नंतर प्रत्यक्षात किंवा पुस्तके, सिनेमा यामध्ये जे पाहिले, वाचले जाते, त्यानुसार एक ‘आयडियल इगो’ म्हणजे आदर्श व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होते.

ही आदर्श प्रतिमा सिनेमातील हिरो/हिरोईन,खेळाडू किंवा उद्योगपती यांची असू शकते. तरुण मुलेमुली त्यांचे फोटो भिंतीवर लावतात. त्या व्यक्तीसारखी हेअरस्टाईल करतात. वागण्याबोलण्यात त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र आदर्श प्रतिमा आणि स्वतचे वास्तव यामध्ये अंतर पडू लागते. हे अंतर अधिक असेल तर ‘सेल्फ एस्टीम’ म्हणजे आत्मसन्मान ढासळतो. आत्मसन्मान कमी असलेली व्यक्ती स्वत:वरील टीका सहन करू शकत नाही, पटकन चिडते, रुसते, रडते. ती सतत स्वत:ची इतरांशी तुलना करीत राहते आणि अस्वस्थ होते. स्वत:ची स्वप्ने, स्वत:कडून असलेल्या अपेक्षा आणि वास्तव यांमध्ये जेवढे अंतर जास्त तेवढी समस्या अधिक मोठी होते. इतरांना दोष देत राहणे, स्वतशी कुढत राहणे, चिडचिड करणे वाढत जाते. कुणी कौतुक केले तरी त्याचाही स्वीकार करू शकत नाहीत. माणसे उगाचच खोटेखोटे बोलतात असे त्यांना वाटत राहते. त्यांचा आत्मविश्वास कमी असतो. आपल्याला एखादे काम जमेल की नाही अशी शंका वाटत राहते त्यामुळे आव्हाने स्वीकारत नाहीत. अशी माणसे वास्तवापासून पळून जाऊन आभासी जगात रमतात, आजचे तंत्रज्ञान आभासी जगाची विविध रूपे दाखवीत त्याला प्रोत्साहन देते.

यामधून बाहेर पडण्यासाठी वास्तवाचा स्वीकार करून स्वत:मधील कौशल्ये आणि उणिवा यांचा तटस्थपणे विचार करणे आवश्यक असते. प्रत्येकात काही गुण, कौशल्ये असतात तशाच काही मर्यादाही असतात. या गुणदोषांची स्वत:ला जाणीव असेल तर टीका झाली तरी तिचा स्वीकार करता येतो. जगात नावे ठेवणारे, टीका करणारे कुणीतरी असतेच. त्यामुळे मला कुणी नावे ठेवूच नयेत ही अपेक्षा चुकीची आहे, याचे भान आले की आत्मसन्मान चांगला राहतो, स्वप्रतिमा वास्तवाशी मिळतीजुळती राहते. अपयशाची भीती वाटत नाही. जिद्दीने प्रयत्न केले जातात.

– डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com