– डॉ. यश वेलणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेंदूत दिसणाऱ्या परिणामांनुसार विविध संप्रदायांत शिकवल्या जाणाऱ्या ध्यानक्रियेचे चार प्रकारांत वर्गीकरण करता येते. एकाग्रता ध्यान, साक्षी ध्यान, कल्पनादर्शन ध्यान आणि करुणा ध्यान अशी नावे त्यांना देता येतील. कोणतेही एक आलंबन निवडून त्यावर लक्ष पुन:पुन्हा नेणे, हे एकाग्रता ध्यान आहे. हे आलंबन एक ज्योत, दिवा किंवा चित्र असू शकते. त्यावर दृष्टी एकाग्र करणे, अन्य विचार मनात येऊ नयेत असे प्रयत्न करणे, ते आले तरी लक्ष पुन्हा त्या दृश्यावर नेणे, हे एकाग्रता ध्यान आहे. एखाद्या आवाजावर किंवा मंत्राच्या उच्चारावर लक्ष ठेवणे, मनातल्या मनात केले जाणारे नामस्मरण हेही एकाग्रता ध्यान आहे.

असेच लक्ष श्वासाच्या स्पर्शावर किंवा छाती-पोटाच्या हालचालीवर एकाग्र करता येते. श्वास आतमध्ये जातो आणि बाहेर पडतो तो लक्ष देऊन जाणायचा. दोन श्वासांच्या मधे जो थोडासा काळ असतो त्याकडेही लक्ष ठेवायचे. अधिकाधिक वेळ यावर एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचा. काही आध्यात्मिक परंपरांत नाम हे श्वासाशी जोडायला सांगितले जाते. श्वास आत जाताना नामाचा अर्धा भाग आणि श्वास बाहेर सोडताना अर्धा भाग घेतला जातो. कोणत्याही प्रकारच्या एकाग्रता ध्यानात लक्ष विचलित झाले आहे, मनात अन्य विचार आले आहेत याचे भान आले, की लक्ष पुन:पुन्हा ठरवलेल्या गोष्टीवर न्यायचे असते. आपले लक्ष विचलित झाले आहे याचे भान माणसाला येते, त्या वेळी त्याच्या मेंदूतील ‘डॉर्सो लॅटरल प्री—फ्रण्टल कॉर्टेक्स’  हा भाग सक्रिय झालेला दिसून येतो. म्हणून या भागाला ‘अटेन्शन सेंटर’ म्हणतात. लक्ष विचलित झाले आणि पुन्हा ठरावीक ठिकाणी आणले असे पुन:पुन्हा केल्याने या भागाचा विकास होतो. त्यामुळेच एकाग्रता वाढते, लक्ष विचलित होत आहे हे लगेच लक्षात येते.

आध्यात्मिक साधनेत हा ध्यान प्रकार अधिक महत्त्वाचा असतो. चित्त एकतान म्हणजे सहजतेने एकाग्र होऊन आत्ममग्न होणे, अन्य सारे विचार लोप पावणे हा एकाग्रता ध्यानाचा परमोच्च बिंदू असतो. यालाच ‘ध्यान लागणे’ म्हणतात. मात्र, सध्याच्या काळात संसारात राहून अशी निर्विचार अवस्था अनुभवायला येणे सहज शक्य नसते. त्या तुलनेत साक्षी ध्यान अधिक सोपे आहे. साक्षी ध्यानात अन्य विचार येता नयेत असा आग्रह नसतो. त्यामुळे साक्षी ध्यानाचा उपयोग उपचार म्हणूनही करता येतो.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on concentration meditation abn