Bhashasutra languages phrase language Marathi examples ysh 95 | Loksatta

भाषासूत्र : मराठीत रुळलेले इतर भाषांमधील वाक्प्रचार

कोणतीही भाषा प्रवाही असते. मराठी भाषाही याला अपवाद नाही. मराठीतही इतर भाषांतील काही वाक्प्रचार रुळले आहेत.

भाषासूत्र : मराठीत रुळलेले इतर भाषांमधील वाक्प्रचार
संग्रहित छायाचित्र

डॉ. नीलिमा गुंडी

कोणतीही भाषा प्रवाही असते. मराठी भाषाही याला अपवाद नाही. मराठीतही इतर भाषांतील काही वाक्प्रचार रुळले आहेत. त्याची ही काही उदाहरणे आहेत. संस्कृत भाषेतील काही अवतरणे आपण आजही वाक्प्रचारासारखी वापरतो. उदा. ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ याचा अर्थ आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत. मराठीत एखाद्या गोष्टीची शाश्वती देताना हा शब्दप्रयोग केला जातो. उदा. लता मंगेशकर यांच्या स्वराची मोहिनी यावच्चंद्रदिवाकरौ टिकून राहील!

‘अमुक व्यक्ती दशमग्रहामुळे अडचणीत!’ असे वाक्य कधीतरी दृष्टीस पडते. यात ज्योतिषाच्या कुंडलीतील ग्रह अपेक्षित नाही. एका संस्कृत श्लोकाचा संदर्भ यामागे आहे. तो श्लोक असा :

‘‘सदा वक्र:, सदा रुष्ट:, सदा पूजामपेक्षते कन्याराशिस्थितो नित्यं जामाता दशमो ग्रह:’’ म्हणजे नेहमी वाकडा, नेहमी रुसलेला, नेहमी मानपानाची अपेक्षा असणारा जावई हा सतत कन्या राशीला लागलेला दहावा ग्रह आहे! यात थट्टेने आलेला ‘दशमग्रह’ हा शब्द मराठीत कसा रूढ झाला आहे, ते पाहा : पु. ल. देशपांडे यांचा ‘अंतू बर्वा’ त्यांना म्हणतो: ‘जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो!’ (व्यक्ति आणि वल्ली). ‘भवति न भवति’ (चर्चा / वाद), ‘नरो वा कुंजरो वा ’(संदिग्ध उत्तर देणे) ही अशी आणखी काही उदाहरणे आहेत.

‘सिंहाचा वाटा’ (मोठा, महत्त्वाचा भाग) हा वाक्प्रचार ‘लायन्स शेअर’ या इंग्रजी वाक्प्रचाराचा अनुवाद आहे. इसापच्या नीतिकथेतील एका गोष्टीशी याचा संबंध जोडला जातो. इतर प्राण्यांबरोबर केलेल्या शिकारीतील सर्वात मोठा भाग सिंहाला हवा असतो, अशा आशयाची ती गोष्ट आहे. सांघिक कार्यातील एखाद्या व्यक्तीचे महत्त्वाचे श्रेय नोंदवताना मराठीत हा वाक्प्रचार वापरला जातो.

हिंदी भाषेतील काही वाक्प्रचार मराठीत रूढ आहेत. १९६७मध्ये हरियाणातील आमदार गया लाल यांनी एका पंधरवडय़ात तीन वेळा पक्षांतर केले. त्यांच्या नावावरून ‘आयाराम, गयाराम’ हा वाक्प्रचार रूढ झाला. मराठीत हा वाक्प्रचार आजही वापरला जातो. अशी आणखीही उदाहरणे आढळतील. अशा वाक्प्रचारांतून भाषिक सौहार्द जाणवते, हे नमूद केले पाहिजे.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाषासूत्र :  म्हणींचे काव्य

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीराने दिली गुडन्यूज, बाळाचा व्हिडीओ केला शेअर
पुणे: सिंहगड रस्ता भागात मोबाइल चोरट्यांची टोळी गजाआड
पुणे: मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटार, फ्लाॅवर, कोबी, वांगी, मिरची स्वस्त
मुंबई: चंदनवाडी स्मशानभूमीतही लवकरच गॅस दाहिनी
IND vs BAN 1st ODI: रोहित-विराटला बाद करत शाकिबने केला मोठा पराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच गोलंदाज