Bhashasutra Marathi science definition Scientific knowledge language students normal readers ysh 95 | Loksatta

भाषासूत्र : मराठी विज्ञान परिभाषा

शास्त्रीय ज्ञान शक्य तितक्या सोप्या भाषेत विद्यार्थी आणि सामान्य वाचकांपर्यंत मराठीतून पोहोचवणं या हेतूने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी विज्ञान परिभाषानिर्मितीला सुरुवात झाली.

भाषासूत्र : मराठी विज्ञान परिभाषा
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

वैशाली पेंडसे-कार्लेकर

शास्त्रीय ज्ञान शक्य तितक्या सोप्या भाषेत विद्यार्थी आणि सामान्य वाचकांपर्यंत मराठीतून पोहोचवणं या हेतूने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी विज्ञान परिभाषानिर्मितीला सुरुवात झाली. मुख्यत: भाषांतर स्वरूपातल्या या लेखनाच्या गरजेनुसार लिहिण्याच्या ओघात सुचलेल्या नवनवीन अर्थवाहक संज्ञा लेखकांकडून वापरल्या गेल्या आणि पुढे त्या रूढही झाल्या.

‘सिद्धपदार्थविज्ञानशास्त्रविषयक संवाद’ या १८३३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या हरि केशवजी पाठारे यांच्या भाषांतरित पुस्तकात इनर्शिया- जडत्व, पुली- कप्पी, पॉवर- उच्चालक, लेन्स- आर्शी अशा काही मराठी, तर अल्कली- आलकेली, लिगामेंट- लिगामेंट अशा काही इंग्रजी तद्भव संज्ञा आढळतात. १८३७ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दिग्दर्शन’ या नियतकालिकामध्ये गुरुत्व, गुरुत्वमध्य, आघात-प्रत्याघात, बिंदू, यांत्रिक शक्ती अशा चपखल संज्ञा सुचवल्या आहेत, तर नैत्रिक अ‍ॅसिड, हैड्रोजन, रेडिअम या संज्ञा अशाप्रकारे मूळ रूपातच ठेवल्या. १८६५ मधील ‘औषधिविद्या’मध्ये नारायण दाजी यांनी सुचवलेले कंपाऊंडर- औषधमेलनकर्ता, प्रिस्क्रिप्शन- चिकित्सालेखन असे अनेक योग्यार्थवाहक शब्द आढळतात. (संदर्भ- मराठी विज्ञान परिभाषा – डॉ. मेधा उज्जैनकर)

पुढे शास्त्रीय ग्रंथ, ‘सृष्टिज्ञान’सारखी नियतकालिकं, ‘मराठी विज्ञान परिषदे’सारख्या संस्था, शासकीय मराठी परिभाषा समिती तसेच अनेकांच्या अथक प्रयत्नांमधून विज्ञान परिभाषा घडत गेली. आजपर्यंत शासनातर्फे विज्ञान विषयांबरोबरच इतर विषयांचे एकूण ४८ परिभाषा कोश प्रसिद्ध झाले आहेत. त्यांतले ३५ महाजालावरही उपलब्ध आहेत. २०२० च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात भारतीय भाषांमधील शिक्षण आणि बहुभाषिकतेवर भर दिला असून शालेय तसेच उच्च शिक्षणासाठीही द्विभाषिक पद्धती सुचवली आहे. यात एक भाषा ही मातृभाषा/ स्थानिक भाषा असेल असे स्पष्टपणे म्हटले आहे. मराठीतून लवकरात लवकर उच्च स्तरापर्यंतचं विज्ञानशिक्षण सुरू करण्यासाठी ही सुसंधी आहे. यात सद्य शब्द वापरले जातील, काही नवीन घडतील आणि काहींसाठी इंग्रजी तद्भवही येतील. यामुळे एकूणच परिभाषानिर्मितीच्या प्रक्रियेला पुन्हा उत्स्फूर्त वेग येईल. आधी परिपूर्ण परिभाषा घडवू, नंतर मातृभाषेतून शिक्षण अशी उलटी प्रक्रिया घडू शकत नाही, हे आपण आजपर्यंतच्या अनुभवातून शिकलो आहोतच.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 00:02 IST
Next Story
भाषासूत्र : वाक्प्रचारांमधील दृष्टांत