डॉ. नीलिमा गुंडी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘भाषासूत्र’ या सदरातील वाक्प्रचारांसंदर्भातील हा माझा समारोपाचा लेख आहे. वाक्प्रचार हा विषय शालेय पातळीवर अभ्यासक्रमात असल्यामुळे वरवर पाहता सोपा वाटतो; म्हणून खरे तर त्याविषयी वर्षभर लिहिणे, हे एक आव्हान होते. त्यासाठी प्रत्येक लेखाकरिता वाक्प्रचार निवडताना मी वेगवेगळी सूत्रे योजली. त्यामुळे सदरातील छोटय़ाशा लेखांना घाट येत गेला. तसेच वाक्प्रचार उलगडून दाखवताना त्यातील शब्दांची व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाचकांना भाषेची मुळे कशी दूरवर, इतर भाषांमध्येही पसरलेली असू शकतात, याचा अंदाज येत गेला. मुख्य म्हणजे भाषा ही जीवनाच्या अनेक क्षेत्रांना कशी कवेत घेते, याचाही वाचकांना प्रत्यय येत गेला. क्वचित वाक्प्रचारांबरोबरच भाषाव्यवहारात वापरले जाणारे विशिष्ट असे काही शब्दप्रयोगदेखील यात आवर्जून समाविष्ट केले.

वाक्प्रचारांच्या उपयोजनासाठी मराठीतील विविध साहित्यप्रकारांची उदाहरणे देण्याचा प्रयत्न केला; कारण या सदराचा अंत:स्थ हेतू वाचकांना नवे भाषाभान देणे, वाचनव्यवहाराला चालना देणे हाच होता. या लेखनाला मान्यवरांप्रमाणे सर्वसाधारण वाचकही प्रतिसाद देत राहिले. काहीजण आपल्या काही शंका विचारत होते, काहीजण आपल्याकडील माहिती मला कळवत होते. त्यामुळे विचारांची देवघेव होत राहिली, लिहिताना हुरूप येत गेला. चुकीचा उल्लेख निदर्शनास आणणारे जागरूक वाचकही भेटले, हे नमूद करायला हवे! भाषा ही बाब आजही आपल्या समाजासाठी दृढ भावबंधन या रूपात मानली जाते, याची जाणीव अशा उत्स्फूर्त प्रतिसादातून होत गेली.

‘पालखीत बसणे’ हा एक जुना वाक्प्रचार आहे. पूर्वी मोठय़ा योग्यतेच्या व्यक्तीला पालखीत बसण्याचा मान मिळत असे. त्यामुळे पालखीत बसणे, याचा अर्थ ‘महत्त्व/ योग्यता वाढणे’ असा आहे. एकंदरीत या सदरामुळे ‘वाक्प्रचार पालखीत बसले’, असे म्हणावेसे वाटते! सर्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी शेवटी इतकेच म्हणेन की आज भाषेची पालखी वाहण्यासाठी आपणा सर्वानाच भोई होण्याची नितांत गरज आहे!

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasutra phrase palanquin phrase subject school in the syllabus ysh