यास्मिन शेख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढील वाक्ये वाचा-

‘‘माझ्या नवऱ्याने माझ्यावर आरोप केले आणि माझा अत्यंत छळ केला. असा अन्याय माझ्या बहिणी, मैत्रिणी यांच्यावर कधीच झाला नाही. मग माझ्यासोबतच असं का होतं?’’

 या वाक्यांचा आशय जरी सहज कळत असला, तरी या वाक्यरचनेत एका शब्दाच्या चुकीच्या प्रयोगामुळे सदोष वाक्य झाले आहे. ते वाक्य शेवटचे – ‘मग माझ्यासोबतच असं का होतं?’ हे आहे. किंवा असेही वाक्य प्रचारात आहे .. ‘माझ्याबरोबरच असं का होतं?’

माझ्यासोबत आणि माझ्याबरोबर या शब्दांत शब्दयोगी अव्यय आहे – सोबत आणि बरोबर. अर्थ आहे – समान, सह, सारखा – वाक्य- ‘तू माझ्याबरोबर चल’ किंवा ‘आपण एकमेकांसह सिनेमा पाहायला जाऊ या’ ही वाक्ये आणि ‘बरोबर’, ‘सह’ ही शब्दयोगी अव्यये योग्य आहेत. सह (शब्दयोगी अव्यय) अर्थ – संगतीने. सोबत (शब्दयोगी) अरबी शब्द (सोहबत) अर्थ – संगत, बरोबर (सह)असणे.

वरील वाक्य ‘माझ्यासोबतच असं का होतं?’ ही वाक्यरचना म्हणजे हिंदीचा प्रभाव- ‘मेरे साथ ऐसा क्यू होता है?’ ‘माझ्याबाबतीच असं का होतं?’ असे वाक्य हवे. अशीच एक चुकीची वाक्यरचना मराठी भाषकांच्या बोलण्यातच नव्हे, तर लिखाणातही आढळते.

 ‘‘माझी मैत्रीण मला म्हणाली, ‘तुझा भाऊ सुरेश माझ्याबरोबर प्रेम करतो.’’’ याही वाक्यात ‘बरोबर’ हे शब्दयोगी अव्यय चुकीचे आहे. हे वाक्य असे हवे- ‘तुझा भाऊ सुरेश माझ्यावर प्रेम करतो,’ किंवा ‘सुरेशचं माझ्यावर प्रेम आहे’ अशा अर्थाच्या वाक्यांत ‘वर’ हे शब्दयोगी अव्यय मराठी भाषेत योजतात. उदा :- ‘माझ्यावर, तुझ्यावर, मुलांवर, भाषेवर (प्रेम) इ. अशीच आणखी एक चुकीची वाक्यरचना- ‘माझ्या भावाने माझ्या मैत्रिणीसोबत लग्न केले.’ या वाक्यातही सोबत हे शब्दयोगी अव्यय चुकीचे आहे. हे वाक्य असे हवे – ‘माझ्या भावाने माझ्या मैत्रिणीशी लग्न केले.’ मराठी भाषेत अशी शब्दयोजना रूढ आहे, मान्य आहे. ‘शी’ तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. मात्र वरील वाक्यांतील चुका न होण्याची खबरदारी आपण, मराठी भाषकांनी घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasutra sentences syntax word wrong because of the faulty sentence ysh