bhojpatra tree information himalayan birch trees zws 70 | Loksatta

कुतूहल : भोजपत्र ते कागद..

भोजपत्रानंतर लेखन साहित्यात अनेक प्रयोग झाले. पहिला कागद दोन हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये तयार झाला.

कुतूहल : भोजपत्र ते कागद..
भोजपत्र म्हणजेच भूजपत्र हा हिमालयात ४५०० मीटर उंचीवर आढळणारा मध्यम आकाराचा, ६० ते ७० फूट उंचीचा, मोठय़ा रुंद पानांचा आकर्षक वृक्ष आहे

मनातून, संवादातून व्यक्त झालेले विचार शब्दरूपात वृक्ष सालीवर उमटविण्याची कल्पना आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी प्रस्थापित होती. मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य घटक आणि त्याच्या लेखनकलेशी जोडला गेलेला भोजपत्र हा वृक्षसुद्धा निसर्गाचा भाग. मानवी भावना, विचार शब्दरूप घेऊन या वृक्षाच्या पातळ मृदू सालीवर सहज उमटत गेल्या. आजही तो ठेवा संस्कृत साहित्याच्या रूपात उपलब्ध आहे.

भोजपत्र म्हणजेच भूजपत्र हा हिमालयात ४५०० मीटर उंचीवर आढळणारा मध्यम आकाराचा, ६० ते ७० फूट उंचीचा, मोठय़ा रुंद पानांचा आकर्षक वृक्ष आहे. या वृक्षाचे  शास्त्रीय नाव आहे  Betula utilis. हा बहुउपयोगी वृक्ष विशेषत: नेपाळ, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतातील हिमालयात राहणाऱ्या भटक्या लोकांसाठी खऱ्या अर्थाने अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. या वृक्षाच्या उंच सरळ खोडावरील बाहेरची साल पातळ कागदासारखी पांढरी शुभ्र असते आणि ती सहज ओढून काढता येते. ओढत असतानाच तिचे वेटोळे तयार होते. ही साल सुरुवातीला पांढरट असते आणि नंतर तांबूस होऊ लागते. सालीवर दाब देऊन संपूर्ण साल कागदासारखी हलकी आणि मऊ केली जाते. यात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यात बेटुलीनीक आम्ल, टरपेनाइडचा अंतर्भाव आहे. यामुळे भोजपत्राची पातळ साल कित्येक वर्ष कीटक आणि बुरशीपासून सुरक्षित राहू शकते. आजही हिमालयात दऱ्याखोऱ्यांत राहणारे मूळचे स्थानिक लोक हातापायाला जखम झाली की त्यावर भोजपत्राची पातळ साल बॅन्डेजप्रमाणे बांधतात.

भोजपत्रानंतर लेखन साहित्यात अनेक प्रयोग झाले. पहिला कागद दोन हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये तयार झाला. त्यासाठी त्यांनी तुती, ताग या वनस्पतींच्या खोडांना पाण्यात भिजवून लगदा केला. त्यावर दाब देऊन कागदासारखा पातळ थर करून, त्यास कडक उन्हात वाळवून त्याचा लिखाणासाठी वापर केला. स्पेनमध्ये सर्वप्रथम यांत्रिक पद्धतीने वृक्षांच्या खोडापासून कागदनिर्मिती झाली. म्हणूनच आज आपणास विविध प्रकारचे कागद, वह्या, पुस्तके, वृत्तपत्रे पाहावयास मिळतात. कागदनिर्मितीसाठी निलगिरी, पॉपलार, बांबू, कापूस, गहू-भात पिकांचे अवशेष, ताग, अंबाडी इत्यादी वनस्पती वापरल्या जातात. एक किलो उत्कृष्ट दर्जाच्या कागदनिर्मितीमागे एका उभ्या ताठ निरोगी वृक्षाचे बलिदान असते हे आपण विसरता कामा नये, म्हणूनच वापरलेल्या कागदाचा पुनर्वापर होणे ही खऱ्या अर्थाने निसर्गसेवा आहे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाषासूत्र : ‘अनु’ आणि ‘अन्’मधला फरक!

संबंधित बातम्या

कुतूहल : निसर्ग रक्षणाची यात्रा
कुतूहल : संरक्षक ओझोन थर
कुतूहल : जादव मोलाई पायेंग

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Laptop खराब होण्याची चिंता विसरा; स्वच्छ करताना वापरा ‘या’ सोप्या टिप्स
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत
“सलमानच्या गाडीला…” अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट
IND vs BAN: आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास! बांगलादेशने जिरवली आणि रोहित सेनेच्या खिशाला कात्री
‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता सोशल मीडियावर मागतोय नोकरी; बायोडेटा शेअर करत म्हणाला…