व्यावसायिक वराहपालनात विदेशी वराहांचे पालन करून चांगले उत्पन्न मिळवणे शक्य आहे. वराहाच्या मांसाला युरोपीय राष्ट्रे व अमेरिकेत चांगली मागणी आहे. भारतात वराहपालन हा व्यवसाय प्रामुख्याने आसाम व उत्तर पूर्व राज्ये या भागांत मोठय़ा प्रमाणात केला जातो. सर्वात जास्त वराहांची संख्या अनुक्रमे आसाम, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांत आहे. त्याखालोखाल दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांत वराह आढळतात.
भारतात वराहाच्या मांसाला इतर प्राण्यांच्या मांसाच्या तुलनेत मागणी कमी आहे. भारतीय बाजारपेठेत वराहाचे मांस कमी भावात विकले जाते. वराहपालकांनी कमी खर्चात दर्जेदार मांस उत्पादन करून विकसित राष्ट्रांमध्ये निर्यात केल्यास हा व्यवसाय फायदेशीर ठरतो.
इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत वराहाची खाद्यापासून मांसात रूपांतर करण्याची क्षमता चांगली आहे. त्यामुळे कमी वेळात वराहाची वाढ झपाटय़ाने होऊन ते विक्रीस उपलब्ध होतात. वराहांना भरपूर खाद्य लागते. वराहपालनात ७० ते ७५ टक्के खर्च खाद्यावर होतो. उपाहारगृहांमधील उरलेले अन्न वराहांना खायला देऊन खाद्यावरील खर्चाची मोठय़ा प्रमाणात बचत करता येईल.
वराहाच्या योग्य वाढीकरता प्रथिने, पिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थाचा खाद्यात समावेश असावा. खनिज द्रव्ये, जीवनसत्त्वे यांचासुद्धा आहारात योग्य प्रमाणात समावेश असावा.
सशक्त वराहांचे तापमान ३८-३९ अंश सेल्सिअस, नाडीचे ठोके ६० ते ७० प्रतिमिनिट, श्वासोच्छ्वास २० ते ३० प्रतिमिनिट असतो. मादीचा गाभणकाळ ११४ दिवस असतो. एका वेतात मादी आठ ते १४ पिल्लांना जन्म देते. मादी वर्षांतून दोनदा पिल्ले देते. मादीपासून पिल्लांना पाचव्या-सहाव्या दिवशी वेगळे केले जाते.
मांस उत्पादनासाठी पाच ते आठ महिने वयाच्या तरुण नरमादींचा वापर केला जातो. ९० ते ११० किलो वजनाच्या वराहांची कत्तल केली जाते. निर्यातीसाठीच्या मांसात स्नायूंचे प्रमाण जास्त व चरबीचे प्रमाण कमी असावे. चरबीच्या प्रमाणावरून मांसाचा दर्जा व किंमत ठरवली जाते.
वराहाच्या मांसापासून पोर्क सलामी, पोर्क बेकॉन, कटलेट, सॉसेजेस, स्मोक्ड हॅम्प असे विविध पदार्थ बनवले जातात.
-डॉ. शरद आव्हाड (नगर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. – वेदान्त-१
काल वचन दिल्याप्रमाणे वेदान्ताबद्दलचे माझे कच्चे-बच्चे कवित्व आता उतरवितो.
(१) हे विश्व ब्रह्म नावाच्या गोष्टीपासून घडले आहे. (२) हे कोणी घडवलेले नाही. (३) कारण ब्रह्म या गोष्टीला मन, इच्छा, हेतू, प्रयोजन या गोष्टी लागू पडत नाहीत. (४) ब्रह्म पसरू लागताच काळ सुरू झाला. (५) या पसरण्यात घटना घडल्या. (६) या घटना घडतात आणि मोडतात त्यांना घडामोडी म्हणतात. तेच कर्म (७) या कर्माच्या घडामोडीत निसर्ग आणि माणूसही जन्मला. (८) माणूस हे कर्माचे स्वरूप आहे म्हणून त्याला कर्म कधीही ओलांडता येत नाही. (९) या घटनांमधून निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूला (निर्जीव आणि सजीव) गुण असतात. (१०) ब्रह्म ही गोष्ट चैतन्य., ऊर्जा, बळ या स्वरूपाची होती. (११) हेच बळ किंवा ऊर्जा प्रत्येक गोष्टीत अंतर्भूत असते. सजीवात तिला आत्मा हे नाव आहे. (१२) विश्वात होणाऱ्या घडामोडी नियमाप्रमाणे चालतात. (१३) या नियमांचे निरीक्षण आणि त्यावरून काढलेली अनुमाने याला विज्ञान म्हणतात. (१४) विश्वात अनेक घटनांची रेलचेल असते ती माणूस अनुभवतो त्याने प्रभावित होतो आणि त्यात अडकतो (!) (१५) निरीक्षणातून इथे एवढे वैविध्य असले तरी हे सगळे एका गोष्टीतूनच तर नाही ना आले असा एक प्रश्न पडतो त्याला ज्ञानाची चाहूल म्हणतात. (१६) हे जर सारे एकाच गोष्टीतून आले असेल तर मग विश्वातील सर्व गोष्टींशी आपोआपच नाते जडते आणि या नात्याच्या अनुषंगाने माणसाचे वर्तन सुधारते. (१७) माणूस कर्माचे रूप असल्याने आणि हे कर्म जिवंत असे तोवर टिकत असल्यामुळे आणि जगावेसे वाटणे ही मूलभूत भावना असल्यामुळे व्यवहार ही गोष्ट निर्माण होते हेही कर्माचे स्वरूप असते, त्यातून कसे वागावे हे द्वंद्व निर्माण होते. (१८) स्वत: इतर आणि निसर्ग यांचा समन्वय साधत वागणे याला कर्मकौशल्य म्हणतात. (१९) कर्मकौशल्य ही गोष्ट सोपी नाही त्यासाठी मनबुद्धी, चित्त शांत ठेवावे लागते. (२०) ही शांतता साध्य करण्यासाठी ध्यानधारणा किंवा सगुण भक्ती हे उपाय आहेत. (२१) कर्म सहजतेने व्हावे, हे विश्व जसे सहजपणे वाटचाल करते तशी करावी, सहजतेने ज्या तऱ्हेने पसरले तसे पसरावे, असे उद्दिष्ट असेल तर आपल्या कुवतीप्रमाणे अपेक्षेशिवाय कर्म करीत राहणे असा उपाय सांगितला आहे.
अर्थात कोणी काहीतरी म्हणावे, ठरवावे, अमलात आणावे असे काही होत नसते हे आपल्या सर्वाना माहीत असतेच. विरोधी पक्ष नेहमीच तयार असतात.
सगळ्या तत्कालीन धर्म तत्त्वज्ञानाचा एक प्रखर विरोधक म्हणजे चार्वाक त्याने सगळ्याच धार्मिक तत्त्वज्ञानाची शकले उडवली आणि मग काळाने येनकेन कारणाने त्याला गाडला. त्या चार्वाकाबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – नाडी परीक्षा – एक अभ्यास (भाग-३)
नाडी म्हणजे काय, असा प्रश्न अभ्यासू रुग्ण विचारत असतात. हृदयाच्या आकुंचनाबरोबर शुद्ध रक्तवाहिन्यांतून रक्त जोराने वाहते. त्या विस्तृत होतात, आकुंचन पावतात. शुद्ध रक्तवाहिन्यांचे उडणे आपणास बाहेरून स्पर्शाने कळते. त्याला आपण  नाडी म्हणतो. हृदयाची गती म्हणजे नाडी. रक्ताच्या अभिसरणामुळे धमन्यांच्या पडद्यास धक्का बसतो. त्या धक्क्याच्या गतीस नाडी म्हणतात. नाडी शब्द रक्ताभिसरणात उत्पन्न होणाऱ्या लहरी किंवा लाटा, त्यांचा बोधक आहे. या लाटास नाडी म्हणतात.
नाडी परीक्षणाकरिता मनगटाच्या ठराविक भागात बोट ठेवून दाबले असता नाडीच्या उडण्याच्या क्रमात अडथळा येतो. लगेच बोट सैल करून नाडी बघितल्यास अडथळा येत नाही. हृदयाचे आकुंचन, प्रसरण यावर वात, पित्त, कफ या दोघांचे नियंत्रण आहेच. सर्व शरीर त्रिदोषाने व्यापले आहे. त्यामुळे नाडीच्या परीक्षणातही वात, पित्त, कफ यांचे कमी-अधिक प्रमाण ढोबळमानाने कळते. आपल्या शरीरात दिवस व रात्रीचे वात, पित्त,  कफ यांचा जो पहारा चाललेला असतो, त्याच्या वेळा सामान्यपणे पुढीलप्रमाणे असतात.
 सकाळी ६ ते १० कफप्राधान्य, सकाळी १० ते दुपारी २ पित्ताचा काळ, दुपारी २ ते सायंकाळी ६ वाताचा प्रभाव. याचप्रकारे रात्रीसुद्धा तिन्ही दोषांचे प्राधान्य समजावे.
चक्कर, भ्रम, रक्तदाबक्षय, पांडुता, डोलणे अशा लक्षणांच्या रुग्णांची नाडी, समुद्रातील लाटांप्रमाणे हाताला अर्धचंद्राकृतीसारखी समजते.  तीव्र तापात नाडी वेगवती असतेच. याउलट बारीक ताप, कणकण, थंडीतापात नाडी खूपच मंदगती, काही वेळेस अस्पष्ट लागते. रक्तदाबाचे औषध न घेता, ब्लडप्रेशर असणाऱ्या रुग्णांची नाडी केव्हाही खूप वेगवती आढळते.
 निद्रानाशात नाडी वाताची, अनियमित असते. श्वास, हृद्रोग विकारात नाडी वेगवती व गच्च बसलेली जाणवते.‘संकलित नाडी विज्ञान’ लेखक वैद्य पटवर्धनांना अनेकानेक नाडी प्रणाम!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – ९ ऑक्टोबर
१८७६ > बौद्ध धर्माचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंडित आणि या विषयावरील लेखक धर्मानंद दामोदर कोसंबी यांचा जन्म. बुद्धघोषाच्या ‘विसुद्धिमग्ग’ या पाली ग्रंथाच्या संपादनासह ‘बुद्धलीलासारसंग्रह’, ‘बुद्ध धर्म आणि संघ’, ‘समाधीमार्ग’, ‘भगवान बुद्ध, बोधीसत्त्व’ असे त्यांचे ग्रंथ मराठीतही प्रकाशित झाले.
१८९२ > लोकहितासाठी लेखणी झिजविणारे गोपाळराव हरी देशमुख तथा ‘लोकहितवादी’ यांचे निधन. ‘प्रभाकर’ या वृत्तपत्रातून त्यांनी १०० हून अधिक पत्रे लिहिली. या ‘शतपत्रां’तून, प्राचीन भारतीय वैभवाच्या ऱ्हासाला भारतीय लोकच कसे कारणीभूत ठरले याची परखड चिकित्साही त्यांनी केली.
१९८९> कथाकार विद्याधर गंगाधर पुंडलिक यांचे निधन. ‘पोपटी चौकट’ हा त्यांचा कथासंग्रह विशेष गाजला. चक्र, चौफुला हे एकांकिकासंग्रह, माता द्रौपदी, चार्वाक, श्रद्धा ही नाटके, ‘आवडलेली माणसे’ हा व्यक्तिचित्र-संग्रह व ‘शाश्वताचे रंग’ (समीक्षा) यांखेरीज, ‘दलित साहित्य’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.
१९९६> लेखिका व साम्यवादी कार्यकर्त्यां गोदावरी शामराव परुळेकर यांचे निधन. ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक, कार्यकर्त्यांच्या कथनाचा वस्तुपाठ ठरले.
– संजय वझरेकर