श्रुती पानसे contact@shrutipanse.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकमेकांच्या प्रत्यक्ष समोर न येता वेगवेगळ्या विषयांवर समूह बनवणं, आपल्या आवडीच्या- अभ्यासाच्या विषयांवर मनमोकळं आणि निर्भीडपणे व्यक्त होणं, जगाच्या वेगवेगळ्या टोकांवर बसून गप्पा मारणं, नाती जोडणं, एकमेकांना विविध कला-कौशल्यं शिकवणं, एकमेकांचे प्रश्न सोडवणं, वस्तूंची विक्री करणं, जाहिराती करणं इथपासून ते एकमेकांशी भरपूर वाद घालणं, पातळी सोडून शिव्या घालणं, आर्थिक फसवणूक करणं.. अशा व यापेक्षाही अनेक गोष्टी समाजमाध्यमांतून घडून येतात. यावर आपला मेंदू कसं काम करतो?

विविध समूहांमध्ये असलेले लोक दिवसातून अनेकदा एकमेकांच्या संपर्कात असतात. मेंदूला ही सर्व नाती खरी वाटतात. त्यामुळे एकमेकांना कधीही न भेटलेली, पण एकमेकांशी रोज लिहून गप्पा मारणारी माणसं प्रत्यक्ष एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यात खरोखरीची नाती, बंध निर्माण झालेले असतात, मत्री झालेली असते. त्यातूनच समाजमाध्यमांवर सुरू झालेली विधायक कामं प्रत्यक्षात उतरली आहेत. तसंच प्रत्यक्षात चालू असलेली कामं फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर जाऊन मोठय़ा जनसंख्येपर्यंत पोहोचलेली आहेत. समाजमाध्यमांचा चांगल्या कामांसाठी उपयोग होतो. पण अनेकदा वाईट आणि भयंकर कामांसाठीही उपयोग करणारे आहेत.

समाजमाध्यमांवरचे वाद ही एक महत्त्वाची बाब आहे. वादविवाद स्पर्धेसारखं वातावरण अशा वेळी असतं. या वादविवादांमुळे परिस्थिती काय आहे, हे लक्षात यायला मदत होते. विषयाच्या दोन्ही बाजू समजायला मदत होते आणि आपल्याला मत तयार करणं सोपं जातं. पण अनेकदा लोक एक बाजू वाचतात, त्याला चिकटून राहतात. इतरांच्या मतानुसार मत न बनवणं, खात्रीच्या स्रोताकडून माहिती मिळवणं फार आवश्यक ठरतं. योग्य गोष्ट ‘शेअर’ करणं ही फार गरजेची बाब झालेली आहे.

वादात आपली बाजू मांडण्यासाठी, दुजोरा देण्यासाठी ‘ट्रोल’धाड असते. अनेकदा ही धाड व्यावसायिक तत्त्वावर काम करणारी असते. यामुळे इथे एखाद्या विषयावर निकोप चर्चा होत नाही. विरोधासाठी विरोध होतो. निष्पन्न काहीच होत नाही. याचाच वाईट आणि क्रूर वापर झुंडीने बळी घेण्यासाठी होतो. तेव्हा केवळ भारतासाठी कंपन्यांना आपली ‘सेटिंग्ज’ बदलावी लागतात.

म्हणूनच समाजमाध्यमं सकारात्मक, विधायक मेंदूंच्या हातात असणं ही फार आवश्यक गोष्ट आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brain work on things happen in social media zws