मुलं शाळेत, घरात त्रास देतात. हट्टीपणा करतात. अस्थिर आहेत. चिडचिड करतात. काहीच करायला नको असतं, असं बऱ्याचदा घडून येतं. ‘कंटाळा’ हा शब्द सध्या बालपणाला चिकटलेला आहे. मुलांना सारखा कंटाळा आलेला असतो. हा कंटाळा नेमका कसला असतो? खरं तर त्यांना जर पुरेसं खेळायला – पळायला दिलं, त्या त्या मुलाला किंवा मुलीला स्वत:ला ज्यात रमावंसं वाटतं, त्यात रमू दिलं तर कंटाळा येणार नाही. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं. सगळ्यांनाच खेळायला आवडतं असं नाही. काहींना खूप आवडतं – काहींना अजिबात नाही. सगळ्यांनाच चित्र काढायला आवडेल असं नाही. सगळ्यांनाच बडबड करायला – गप्पा मारायला आवडेल, असं नाही. प्रत्येकाची आवड आणि नावड वेगवेगळी असते.
पूर्वी शाळेत संगीत, नृत्य, चित्रकला, मातीकाम, घडीकाम, चिकटकाम, खेळ, शारीरिक शिक्षण यांचे तास तुलनेत जास्त असायचे. मुलं चालत, सायकलने गप्पा मारत यायची- जायची. त्यामुळे जास्तीतजास्त मेंदू वापरायला मिळे. आता अभ्यास एके अभ्यास- यामुळे त्यांचाही दिवस मोठय़ा माणसांसारखा बराचसा एकसुरी असतो. प्राधान्याने फक्त डाव्या मेंदूलाच काम. भाषा, लेखन-वाचन, गणित, प्रश्नांची उत्तरं अमुक शब्दात लिहिण्याची तयारी इत्यादी. पूर्ण मेंदू वापरण्याची १०० टक्के क्षमता आणि इच्छा असताना केवळ एकसुरी कामात गुंतवून ठेवलं जातं, याने मेंदूला कंटाळा येतो. तो थकतो. वास्तविक मेंदूला नवीन गोष्टी शिकायला- करायला हव्या असतात. पण शाळा आणि बरोबरीने पालक जर अभ्यासात जखडून टाकणारे असतील तर एकूण मेंदूला काही आव्हानच उरत नाही. उजव्या मेंदूतल्या तितक्याच आवश्यक क्षेत्रांना – रंग, विविध कला, संगीत यांना पुरेसं उद्दीपन मिळत नाही. त्यामुळे मेंदू शारीरिकदृष्टय़ा ‘अॅक्टिव्ह’ राहत नाही.
शरीर आणि मेंदू दोन्ही उद्युक्त झाले तरच खरी मजा! मुलं लहान असतील तर अगदी घर घर, शाळा शाळा असे साधेसुधे खेळ खेळली तरी चालतील. पण या खेळातून संवाद, योजना, भावना, ताíककता या गोष्टी मेंदूत घडून येतात. शिवाय मुलं कल्ला करत हे खेळतात, त्यातून भरपूर गडबड, अगदी भांडाभांडी – आणि शेवटी आनंदच मिळतो.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com