different types of leaves and their sizes lotus and banana leaf zws 70 | Loksatta

कुतूहल : पर्णाकारांची विविधता!

कमळाचे पान बरेचसे गोलाकार तर अळूचे टोकदार. पानाच्या टोकावरून, पानावर पडलेले पावसाचे पाणी अलगद वाहून जाते.

कुतूहल : पर्णाकारांची विविधता!
(संग्रहित छायाचित्र)

कमळाचे पान आणि केळीचे पान! दोन्हीचा पसारा मोठा, पण आकारामध्ये केवढा तरी फरक! कमळाचे पान गोलाकार, जाडसर, रुंद, पानाला मजबुती देणारे शिरांचे जाळे आणि पाण्यात सतत राहूनही कुजू नये म्हणून एका बाजूला मेणचट पदार्थाचा थर. केळीच्या पानाचा मोठा आकार, समांतर शिरा, अगदी पातळशी रुंदी! निसर्गत: केळीचे झाड उष्ण हवामान, दलदल किंवा ओलसर अशा मातीत उगवते. सभोवतालच्या उष्ण वातावरणाचा आणि स्वत:च्या वाढीचा समतोल साधण्यासाठी केळीचे भले मोठे पान खूप सूर्यप्रकाश शोषून घेते, पण खूप मोठय़ा प्रमाणात बाष्पाचे म्हणजे पाण्याचे उत्सर्जनही करत असते. त्यामुळेच तर त्याचा आकार मोठा असणे आवश्यक असते.

कमळ आणि अळू! पाण्याच्या अतिसंपर्कामुळे, कुजून जाऊ नयेत म्हणून या दोन्ही वनस्पतींच्या पानांवर मेणचट पदार्थाचा थर असतो; पण दोन्ही वनस्पतींच्या पानांचा आकार पूर्णपणे वेगळा. कमळाचे पान बरेचसे गोलाकार तर अळूचे टोकदार. पानाच्या टोकावरून, पानावर पडलेले पावसाचे पाणी अलगद वाहून जाते.

केळीचे पान आणि नारळाचे पान, यात काय फरक? कोणी म्हणेल, अहो केळीच्या एका शिरेला एकच अखंड मोठ्ठं पान असतं तर नारळाच्या एका शिरेला समांतर पात्यांसारखी अनेक पाने असतात. खरं तर अनेक समांतर उपपाने असलेली रचना असलेले नारळाचे एकच पान एका शिरेला असते. निसर्गत: नारळाची झाडं समुद्रकिनारी असतात. तिथे वाऱ्याचा जोर जास्त असतो, त्या वाहत्या वाऱ्याला भल्या मोठय़ा पानामुळे अडथळा येऊ नये आणि वाऱ्याच्या जोरामुळे पान फाटूनही जाऊ नये, या उद्देशाने नारळाच्या पानाची अशी विशिष्ट रचना असते.

थोडक्यात काय तर, वनस्पतीविश्वात पर्णाकारांच्या विविधतेचा प्रचंड खजिना आहे. ही विविधता विनाकारण नसून, त्यामुळे हवामान, एकूणच पर्यावरण आणि त्या त्या विशिष्ट वनस्पतींच्या वाढीच्या गरजा अशा साऱ्या गोष्टींचा समतोल साधला जातो. पान गोलाकार असावे की लंबगोलाकार, पसरट असावे की निमुळते, पानाच्या कडा धारदार असाव्या की गुळगुळीत, पानांचा टोकाचा भाग अगदी अणकुचीदार असावा की बोथट, पानाची लांबी, रुंदी, जाडी किती असावी, आणि एखाद्या झाडावर पानांची संख्या किती असावी; या गोष्टी ती वनस्पती कोणत्या परिसंस्थेचा घटक आहे, यावरून ठरतात. एखाद्या झाडाच्या पानाचे निरीक्षण करून, ते झाड कोणत्या परिसंस्थेचा घटक आहे, याचाही अंदाज बांधता येतो.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 04:15 IST
Next Story
भाषासूत्र : क्रियापदासाठी वाक्यातील शेवटचा कर्ता महत्त्वाचा!