जिथे फक्त सरशी असते तिथेच पारशी जातो, असे काही नाही हे पारशी समाजातल्या अनेक व्यक्तींनी आपापल्या कर्तृत्वाने दाखवून दिलंय! भारतीय जनमानसात समरस होऊन या ‘परक्यांनी’ व्यापार, औद्योगिकक्षेत्र, कलाक्षेत्र, विज्ञान, संशोधन अशा सर्व क्षेत्रांत मोठय़ा भराऱ्या मारलेल्या दिसतात. यातील एक होमी जहांगीर भाभा हे होत. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा आणि अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. १९०९ साली एका सधन पारशी कुटुंबात मुंबई येथे होमी भाभा यांचा जन्म झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर. त्यांना पुस्तकांची आवड असल्याने घरात मोठा पुस्तक संग्रह होता आणि त्यात विज्ञानविषयक पुस्तकेही होती. होमी भाभांना या पुस्तकांमुळे विज्ञानविषयक औत्सुक्य निर्माण झाले. होमींचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या कॅथड्रल अ‍ॅण्ड केनन स्कूलमध्ये तर पुढे एल्फिन्स्टन कॉलेज आणि रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून ते बी.एस्सी. झाले. होमींचे वडील आणि काका दोराबजी टाटा यांनी ठरवलं होतं की होमींनी मेकॅनिकल इंजिनीअर होऊन जमशेदपूरच्या टाटा स्टील कंपनीची तांत्रिक बाजू सांभाळावी. परंतु होमींची आवड होती गणित आणि भौतिकशास्त्राचा सखोल अभ्यास करण्याची. त्यामुळे प्रथम मेकॅनिकल इंजिनीअरिंग करून मगच गणितात पदवी मिळविण्याच्या अटीवर होमींना त्यांच्या वडिलांनी परवानगी दिली. होमींनी १९३० मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्रथमश्रेणीत मिळवली. त्याच काळात त्यांनी पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास केला, कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचाही अभ्यास करून १९३३ साली भाभांनी डॉक्टरेट मिळवली. १९३९ साली होमी भाभा भारतात परतले. या काळात दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. त्यांनी मग इंग्लंडमध्ये परत न जाता बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये अध्यापनाचे काम केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr homi bhabha