पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मातीच्या थराला मृदा असेही म्हणतात. निरनिराळ्या ठिकाणच्या मातीत काही मृद्खनिजे (क्ले मिनरल्स) आढळतात. एखाद्या ठिकाणच्या मातीत कोणती मृद्खनिजे असतील ते तिथे कोणते खडक आहेत त्यावरून ठरते. मातीच्या विविध प्रकारांना रेताड, चिकण, गाळाची, काळी, लाल, क्षारयुक्त माती, तसेच मुलतानी अशी नावे त्यांच्या गुणधर्मांवरून दिली गेली आहेत. मातीची उत्पत्ती, रंग, रचना, पोत इ. निकषांवर मातीचे वर्गीकरण केले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलतानी माती (फुलर्स अर्थ) म्हणजे काही विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या मृद्खनिजांचा एक गट होय. या गटातल्या खनिजांचे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन) मूलत: जलीय (हायड्रेटेड) अॅल्युमिनियम सिलिकेट असे असते. प्रामुख्याने उष्णकटिबंधातल्या किंवा समशीतोष्ण कटिबंधातल्या प्रदेशात ही माती आढळते. ज्या वेळी अवसादी खडकांचे (सेडिमेंटरी रॉक्स) प्रस्तर निर्माण होत असतात, त्या वेळी त्याच्यामध्ये मुलतानी मातीचा एखादा प्रस्तर निर्माण होऊ शकतो. शिवाय मुलतानी माती निर्माण होण्याची दुसरीही एक प्रक्रिया आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेचे थर साठत असतात. कालांतराने त्या थराचे रासायनिक विघटन होऊन मुलतानी मातीची निर्मिती होऊ शकते.

मुलतानी मातीच्या गुणधर्मांत विविधता आढळते. कधी कधी तर एकाच ठिकाणच्या साठ्यातल्या मातीचे गुणधर्मही एकसारखे नसतात. तिचा रंग फिकट, तपकिरी, करडा, पांढरा, पिवळा किंवा क्वचित हिरवट असतो. ही माती अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते. मुलतानी माती निरनिराळ्या भूवैज्ञानिक कालखंडात निर्माण झालेल्या पाषाणसमूहांमध्ये आढळते.

मुलतानी मातीचे साठे जगात सर्वत्र आहेत; पण कुठे ते कमी, तर कुठे जास्त प्रमाणात असतात. भारतात राजस्थानातल्या बिकानेर आणि जैसलमेर जिल्ह्यात, मध्य प्रदेशात जबलपूर आणि कटनी जिल्ह्यात, तसेच कर्नाटकातही काही जिल्ह्यांमध्ये ती आढळते. पाकिस्तानातल्या मुलतान या शहरावरून या मृद्खनिजाला मुलतानी माती हे नाव पडले आहे. या मातीत विरंजन करण्याची, म्हणजे सेंद्रिय रंग घालवण्याची क्षमता नैसर्गिकरीत्याच असते, मात्र तापवल्यास ती नष्ट होते.

पूर्वी लोकरी कापडाचा तेलकटपणा घालवण्यासाठी आणि ते कापड उजळ करण्यासाठी या मातीचा वापर होऊ लागला. या प्रक्रियेला इंग्रजीमधे ‘फुलिंग’ असे म्हणत, तर ही प्रक्रिया करणाऱ्याला ‘फुलर’ म्हणत यावरूनच या मृद्खनिजाला इंग्रजीमध्ये ‘फुलर्स अर्थ’ हे नाव पडले. या मातीचा उपयोग प्रामुख्याने वनस्पतीज तेल, खनिज तेल, प्राण्यांची चरबी यांच्या विरंजनासाठी होतो. पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी, तसेच रबर, कीटकनाशके, सौंदर्यप्रसाधने यांच्या निर्मितीमध्ये मुलतानी मातीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

– प्रा. प्रकाश कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earth surface soil layer soil type multani soil ssb