हजारो वर्षांपासून भारतात येऊन स्थायिक होणाऱ्या विविध समाजांच्या ‘परकियांपकी’ ज्यू धर्मीय समाज आहे. हा ज्यू समाज कोण, कुठला, यांचा धर्म आणि भाषा तसेच या लोकांनी दूरवरच्या प्रदेशात का स्थलांतरे केली याची माहिती घेणे उचित ठरेल. ज्यू समाज हा मूळच्या पॅलेस्टाइन म्हणजे सध्याच्या इस्रायलमधला. त्यांचा धर्म ज्युदाइझम आणि भाषा हिब्रू. साधारणत इ.स.पूर्व १०५०च्या सुमारास या समाजाचा प्रमुख जेकब याला बारा पणतू होते. पुढे या पणतूंच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या टोळ्या तयार झाल्या. यापैकी दहा टोळ्या एकत्र येऊन त्यांनी आपले राज्य उत्तर इस्रायलमध्ये तर बाकीच्या दोन टोळ्यांनी त्यांचे राज्य दक्षिण इस्रायलमध्ये स्थापले.

इ.स.पूर्व ७२२ मध्ये आसिरीयन राजाने उत्तरेतल्या दहा टोळ्यांच्या ‘किंगडम ऑफ इस्रायलवर’ आक्रमण करून ते पार उद्ध्वस्त केले. पुढे या आसिरीयन राज्यकर्त्यांनी ज्यू टोळ्यांचा छळवाद करून त्यांचे शिरकाण सुरू केले. अखेरीस या दहा ज्यू टोळ्यांनी इस्रायल (तत्कालीन पॅलेस्टाइन)मधून जमेल तसे पलायन करून दूरवरच्या प्रदेशांमध्ये आश्रय घेतला. ज्यूंच्या इतिहासात या परागंदा झालेल्या दहा टोळ्यांना ‘लॉस्ट ट्राइब्ज’ असे नाव आहे. या पलायन केलेल्या ज्यूंपैकी काही लोक युरोपियन देशांमध्ये, काही जण आशियातील देशांमध्ये स्थलांतरित झाले. पुढे युरोपातही त्यांचा छळ सुरू झाल्यावर काही जण आशियाई प्रदेशात, विशेषत भारतीय द्विपकल्पात स्थायिक झाले.

भारतात येऊन स्थायिक झालेल्या ज्यूंचे सात गट होते. प्रसिद्ध इटालियन प्रवासी मार्को पोलो इ.स. १२९३ मध्ये भारतात आला. त्यावेळी मलबारच्या किनारपट्टीवरील ज्यू लोकांची वसाहत पाहून आश्चर्यचकित झाला. येमेनमधून सातव्या शतकात या प्रदेशात आलेल्या व्यापाऱ्यांचे हे वंशज पुढे कोचिनच्या परिसरात स्थायिक झाले. या ज्यूंच्या वसाहतीला पुढे ‘ज्यू टाऊन’ असे नाव होऊन या ज्यूंना कोचिन ज्यू किंवा मलबार ज्यू असे नाव पडले. यांना ‘ब्लॅक ज्यू’ असेही नाव आहे. कोचिनच्या राजाने या निर्वासितांना या परिसरात वसती करून त्यांची प्रार्थना मंदिरे म्हणजे सिनेगॉग उभारण्यास परवानगी दिली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com