information about ocean currents zws 70 | Loksatta

कुतूहल :  सागरी प्रवाह

कोरिऑलिस प्रभाव आणि भूखंडाचे आकार यांमुळे सागरी प्रवाहांचे प्रचंड मोठे भोवरे किंवा आवर्त तयार होतात.

ocean currents information
सागरी प्रवाह

समुद्राच्या पाण्याची ठरावीक दिशेकडे नियमितपणे होणारी हालचाल म्हणजेच सागरी प्रवाह. हे उष्मा आणि बाष्पाची वाहतूक करणारे लांबलचक वाहक पट्टे असतात. ऋतुचक्र आणि सागरी जैवविविधतेवर त्यांचा लक्षणीय परिणाम होतो.

समुद्रात वेगवेगळय़ा स्तरांमध्ये सागरी प्रवाह आढळतात. पाण्याच्या तापमानातील फरक, वारा, क्षारता आणि पृथ्वीचे परिवलन असे अनेक नैसर्गिक घटक याला कारणीभूत असतात. पृष्ठभागाजवळ वरच्या स्तरांमध्ये ३०० मीटर खोलीपर्यंत वाहणाऱ्या प्रवाहांना ‘पृष्ठीय प्रवाह’ म्हणतात. वेगाने वाहणारा वारा पृष्ठभागावरील पाणी आपल्या वाहण्याच्या दिशेने ओढतो, त्यामुळे पृष्ठीय प्रवाह निर्माण होतात. सर्वसाधारणपणे पृष्ठीय प्रवाहांची दिशा वाऱ्याच्या दिशेप्रमाणे ठरते. परंतु पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या कोरिऑलिस प्रभावामुळे त्यांच्या वाहण्याचे मार्ग गुंतागुंतीचे होतात. कोरिऑलिस प्रभावामुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात आपल्या मूळ दिशेपासून ४५ अक्षांश उजवीकडे, तर दक्षिण गोलार्धात मूळ दिशेपासून ४५ अक्षांश डावीकडे वळतात. भूखंडांच्या विशिष्ट आकारामुळे प्रवाहांची दिशा बदलते. अशा प्रवाहांना ‘सीमा प्रवाह’ म्हणतात. त्यांचे पूर्व आणि पश्चिम सीमा प्रवाह हे दोन प्रकार आहेत. पूर्व सीमा प्रवाह समुद्रद्रोणीच्या पूर्वेला तर पश्चिम सीमा प्रवाह पश्चिमेला आढळतात.

कोरिऑलिस प्रभाव आणि भूखंडाचे आकार यांमुळे सागरी प्रवाहांचे प्रचंड मोठे भोवरे किंवा आवर्त तयार होतात. पाच प्रमुख आवर्त, म्हणजेच उत्तर आणि दक्षिण-अटलांटिक आवर्त, उत्तर आणि दक्षिणी प्रशांत आवर्त आणि हिंदी महासागरी आवर्त. ते बाष्प आणि उष्णता पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात वाहून नेतात.

तापमान आणि क्षारता यांमधील असमानतेमुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात. अधिक क्षारतेचे जड पाणी जास्त घनतेचे असते तर कमी क्षारतेचे पाणी हलके असते. वेगवेगळय़ा क्षारतेच्या पाण्याचे थर एकमेकांजवळ आल्यास जड पाणी खाली जाऊन हलके पाणी वर येते. तापमानातील फरकामुळे देखील पाण्याची हालचाल घडते. थंड पाणी जड असल्याने तळाकडे जाते याउलट उष्ण आणि हलके पाणी पृष्ठभागाकडे येते. तापमान किंवा क्षारता समान करण्यासाठी पाण्याची हालचाल होते, या कारणाने ५०० ते १००० मीटर खोलीपर्यंत खोल सागरी प्रवाह तयार होतात. सागरी प्रवाहांची सरासरी गती प्रती तासास ३ ते ९ किलोमीटर इतकी असते. परंतु पृष्ठभागावरील प्रवाह खोल पाण्यातील प्रवाहांपेक्षा वेगाने वाहतात. तापमानावर आधारित शीत व उष्ण सागरी प्रवाहांची माहिती पुढील लेखात घेऊ या.

अदिती जोगळेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 02:23 IST
Next Story
कुतूहल : पाणथळींचे संवर्धन ही काळाची गरज