कुतूहल : ‘बायफ’ संस्था आणि ग्रामविकास

‘माझे आश्रम हे ग्रामीण भारताच्या विकासाच्या प्रयोगशाळा आहेत,’ असे म्हणणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या वाटेवर ‘बायफ’ (भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउण्डेशन) ही कृषी संशोधन क्षेत्रातील संस्था गेली ५५ वर्षे वाटचाल करत आहे.

lk3 kutuhal BAIF
‘बायफ’ संस्था

‘माझे आश्रम हे ग्रामीण भारताच्या विकासाच्या प्रयोगशाळा आहेत,’ असे म्हणणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या वाटेवर ‘बायफ’ (भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउण्डेशन) ही कृषी संशोधन क्षेत्रातील संस्था गेली ५५ वर्षे वाटचाल करत आहे. संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय पुण्यापासून जवळ ‘उरळी-कांचन’ येथे आहे. आज देशाच्या अनेक राज्यांत संस्थेचा विस्तार झाला आहे. ‘बायफ’ची स्थापना १९६७ मध्ये थोर गांधीवादी विचारवंत डॉ. मनीभाई देसाई यांनी केली. भारतीय कृषिक्षेत्रास निसर्गाकडून विज्ञानाकडे घेऊन जाणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश होता आणि तो साध्य करण्यात संस्था पूर्णपणे सफल झाली आहे.

‘बायफ’ने पशुधन विकास आणि पशू आहारामध्ये उच्च संशोधन केले आहे. फळउद्यान निर्मितीच्या माध्यमातून आदिवासी समाजापर्यंत विज्ञान घेऊन जाण्याचे फार मोठे कार्य प्रत्यक्षात आणले आहे. हजारो गरीब अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात आधुनिक पद्धतीने विविध फळझाडांची लागवड करून, संस्थेने या शेतकऱ्यांच्या कुटुंबांस अन्नसुरक्षेबरोबर आर्थिक स्तरावरही स्वावलंबित्व मिळवून दिले आणि बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यास मदत केली आहे. त्यांच्या या ‘वाडी’ प्रकल्पाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही नोंद घेण्यात आली आहे. कलम पद्धतीतून निर्माण केलेली ही फळबाग पारंपरिक पद्धतीपेक्षा दुप्पट आणि तेही गुणवत्तासंपन्न उत्पादन देते. आज भारताच्या ११ राज्यांत सहा हजार ४८३ पेक्षा जास्त गावांमध्ये हा प्रकल्प यशस्वी झाला आहे.

गांधीजींच्या ‘ग्रामीण विकासास विज्ञानाची जोड देऊन शेतीबरोबरच निसर्गसंवर्धन करताना निसर्ग आणि विज्ञान यांचा समतोल साधा,’ या विचाराने प्रेरित होऊन संस्थेने मृदा, महिला आणि जल क्षेत्राबरोबरच २००८ पासून पारंपरिक बियाणे संवर्धन आणि संरक्षणाचे कार्य हाती घेतले. त्यांनी महाराष्ट्राच्या पाच आदिवासी भागांत जाऊन नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ६०० पेक्षा जास्त स्थानिक वाणांचे संकलन आणि दस्तावेजीकरण केले. उरळी कांचन या मध्यवर्ती संशोधन केंद्रात हे बियाणे शीतपेटय़ांमध्ये साठवण्यात आले. या उपक्रमातून ‘बायफ’ने राष्ट्रीय जनुकीय कोषात योगदान दिलेच शिवाय ग्रामीण भागांतसुद्धा या बियाणांच्या बीज बँका तयार केल्या. विशेष म्हणजे या संकलनात १३५ पेक्षा जास्त रानमेवा आणि रानभाज्या आहेत. या सर्व बीज बँका, बीजमाता म्हणजे स्थानिक महिलाच चालवतात. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कार्यही याच संस्थेच्या माध्यमातून जगापुढे आले.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal baif institution rural development rural development india laboratory ysh

Next Story
भाषासूत्र : घोडय़ाची पेंड आणि ताकाची तूर..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी