कुतूहल : सागरी परिसंस्था

सागरी परिसंस्था ही जलीय पर्यावरणाचाच भाग! येथे विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण खूप जास्त असते.

kutuhal sea

डॉ. नंदिनी वि. देशमुख

सागरी परिसंस्था ही जलीय पर्यावरणाचाच भाग! येथे विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण खूप जास्त असते. येथील जैविक घटकांत पाणवनस्पती, प्राणी आणि जिवाणू व अजैविक घटकांत  सूर्यप्रकाशाची उपलब्धता, ऑक्सिजनचे प्रमाण, तापमान, पाण्यात विरघळलेली पोषकद्रव्ये, क्षारता, महासागराची खोली, भूमीबरोबरचे सान्निध्य हे महत्त्वाचे भाग असतात.

सागरी परिसंस्थेसाठी सूर्यप्रकाश हा सर्वात महत्त्वाचा अजैविक घटक आहे. पाण्यात किती खोलवर सूर्यप्रकाश पोहोचतो, यावर सागरी परिसंस्थेचे तीन विभाग पडतात, ते असे: २०० मीटपर्यंतचा ‘प्रकाशी’, २०० ते १००० मीटपर्यंतचा अल्पप्रकाशी आणि १००० मीटरपेक्षा खालचा अप्रकाशी. शास्त्रज्ञांच्या मते सागरी परिसंस्थेचे वर्गीकरण खाडय़ा, मिठागरे/ खाजणे, कांदळवने, प्रवाळ भित्तिका, ओपन सी म्हणजेच पसरलेला अथांग महासागर आणि खोल समुद्र, असेही करता येते.

खाडी हा किनारपट्टीचा भाग असून तेथे नद्या समुद्राला येऊन मिळतात. येथे पोषणद्रव्ये आणि क्षार समुद्रात मिसळत असल्यामुळे पाणी समृद्ध असते. येथील हवामान तुलनेने नियमित असते, म्हणूनच खाडय़ांचा भाग अतिउत्पादनाचा भाग समजला जातो. खाडय़ांवर मासेमारी, जलवाहतूक, नौकानयन असे व्यवसाय व उपजीविका अवलंबून असतात. ज्या ठिकाणी समुद्र भूमीवर सरकतो, त्या ठिकाणी मिठागरे तयार होतात. हे प्रदेशदेखील सुपीक असतात कारण समुद्रातील गाळ येथे येतो. भरतीच्या वेळी येथील दलदलीचा प्रदेश पाण्याखाली जातो आणि संपूर्ण भूमी ओली आणि खारट होते. येथील मातीत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असून कुजणारे पदार्थ जास्त असतात. कांदळवने ही मुख्यत्वे विषुववृत्तीय प्रदेशांत आढळतात. येथे समुद्राचे पाणी सतत शिरत असते आणि तिवरांची झाडे केवळ त्यांच्या अनुकूलनामुळे येथील बदलत्या पर्यावरणात तोंड देत राहतात. अनेक अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय सागरी प्राण्यांच्या या ‘नर्सरी’ असतात. तसेच अनेक पक्षीदेखील येथे घरटी बांधतात. 

प्रकाशी पट्टय़ात प्रवाळांच्या बाह्य आवरणापासून तयार झालेल्या प्रवाळ भित्तिका असतात. येथे हरतऱ्हेचे सजीव अधिवास करतात. प्रवाळ भित्तिकांच्या नंतर येणारा समुद्राचा अथांग भाग उजेड आणि ऑक्सिजनने समृद्ध असतो. व्हेल, डॉल्फिन, शार्क, असे मोठे प्राणी येथे वास्तव्य करतात. अंधाऱ्या, थंडगार, खोल समुद्रात ऑक्सिजन कमी असतो. या ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांमध्ये विलक्षण अनुकूलन दिसते. रासायनिक संश्लेषणाद्वारे येथे ऊर्जा मिळवली जाते, कारण इथे प्रकाशसंश्लेषण अजिबात होत नाही.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 00:02 IST
Next Story
कुतूहल : समुद्रविज्ञानाची परिभाषा
Exit mobile version