पर्वतरांगा हे पृथ्वीवरील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वांच्या डोळ्यात भरणारे भूरूप आहे. त्यांची उत्पत्ती कशी झाली असावी, याविषयी आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या कल्पना मांडल्या होत्या. पर्वतांची निर्मिती ही विविध प्राचीन संस्कृतींनी देवतांशी, अलौकिक शक्तींशी किंवा दैवी घटनांशी जोडली असली, तरी प्रत्यक्षात मात्र ती कोट्यवधी वर्षांपासून भूगर्भात आणि भूपृष्ठावर घडणाऱ्या हालचालींमुळे होत असते.
नद्यांनी वाहून आणलेला गाळ साठल्याने, भूकंपाने, अथवा अन्य नैसर्गिक प्रक्रियांमुळे पर्वतांची निर्मिती झाली, असे तर्कसुसंगत मत काही ग्रीक आणि रोमन तत्त्वज्ञांनी सांप्रतकालपूर्व (बिफोर प्रेझेंट) चौथ्या शतकानंतर मांडले होते; पण त्यासाठी पुरेसा वैज्ञानिक आधार नव्हता. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात जेम्स हटन यांनी क्षेत्रीय निरीक्षणांच्या आधारे पर्वतांच्या उत्पत्तीविषयी वरील अनुमानांना वैज्ञानिक जोड दिली.
सांरचनिक पर्वतरांगांच्या निर्मितीच्या कारणांचा परिपूर्ण उलगडा १९६०च्या दशकात झाला. सागरतळाशी असणाऱ्या पर्वतरांगांचा (मिडओशिअॅनिक रिजेस) आणि गर्तांचा (मिडओशिअॅनिक ट्रेंचेस) शोध लागला. पृथ्वीचे शिलावरण (लिथोस्फिअर) अनेक सांरचनिक भूपट्टांचे मिळून बनले आहे हे लक्षात आले. भूगर्भात सतत सुरू असणाऱ्या उष्णतेच्या अभिसरण प्रवाहांमुळे (कन्व्हेक्शन करंट्स). भूपट्ट एकमेकांपासून दूर जात असतात किंवा एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली खेचला जात असतो. भूपट्ट एकमेकांपासून दूर जात असतील, तर सागरतळाशी ज्वालामुखींचे उद्रेक होऊन लाव्हारस तिथे येतो आणि नवीन खडक तयार होतात. त्यामुळे सागरतळाशी मध्य-महासागरी पर्वतरांग निर्माण होते. आणि जर एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली खेचला जात असेल, तर मध्य-महासागरी गर्ता निर्माण होतात. महासागरांच्या अभ्यासातून मिळालेली ही माहिती आधुनिक भूविज्ञानाच्या विकासातला मैलाचा दगड ठरली.
सुमारे पाच कोटी वर्षांपासून भारतीय भूपट्ट युरेशिअन भूपट्टाखाली खेचला जात आहे. आणि त्यामुळे दोघांच्या मध्ये पूर्वी जो टेथिस नावाचा महासागर होता, त्यातले अवसादी खडक वर उचलले जाऊन हिमालय ही घड्यांची पर्वतरांग निर्माण झाली.
अशा भूगर्भीय घडामोडींचा आणखी एक परिणाम म्हणजे एखाद्या भूभागाच्या दोन बाजूंचे प्रदेश प्रस्तरभंग (फॉल्ट) होऊन खाली खचतात आणि मधला भाग वर उचलला जाऊन त्यापासूनही पर्वत निर्माण होतो. अशा पर्वतांना भूवैज्ञानिक परिभाषेत उद्धृतभूमी (हॉर्स्ट) म्हणतात. शिलॉन्गचे पठार या पद्धतीनेच निर्माण झाले आहे.
याखेरीज, जपानमधल्या फुजियामाप्रमाणे काही पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनू शकतात. तर भोवतालच्या भूप्रदेशाची झीज झाल्याने शिल्लक राहिलेल्या उंच भागाला आपण पर्वतच म्हणतो. दक्षिण भारतातला निलगिरी पर्वत हे अशा पर्वताचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
–अरविंद आवटी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org