स्वच्छंद गगनविहार करण्याचे माणसाचे स्वप्न साकार झाले ते १९०३ साली राईट बंधूंमुळे! त्या पहिल्या विमान उड्डाणापासून सुरुवात करून आज मोठमोठय़ा आणि वेगवान विमानांची बांधणी करून गगनाला गवसणी घालण्यात मानव यशस्वी झाला आहे. हे शक्य झाले, पक्षी उडताना केलेल्या निरीक्षणांना/ अभ्यासाला भौतिकशास्त्राची जोड दिल्याने. उडण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी हवेत मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करणे ओघानेच आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्ष्याच्या जवळपास जाणारा सांगाडा तयार करून राईट बंधूंनी पहिले यशस्वी उड्डाण केले. त्यानंतर बऱ्याच सुधारणा होत होत विमानाला आजचे स्वरूप आले आहे. आजही विमानाची बांधणी आणि  पक्ष्याचा आकार यात बरेच साम्य आढळते. पक्ष्यांची हाडे हलकी असतात, शरीराचा सांगाडा पोकळ असतो. चोच टोकदार आणि वजनाने हलकी असते. शिवाय उडताना पक्षी शरीराचा आकार निमुळता करतात, ज्यायोगे शरीराचा  हवेच्या संपर्कात येणारा पृष्ठभाग कमीत कमी राहतो. परिणामी हवेचा त्यांच्या गतीला होणारा विरोधही कमी असतो. या सगळय़ा गोष्टी लक्षात घेऊनच विमानाची बांधणी केली गेली आहे.

विमानबांधणीसाठी वापरण्यात येणारा मिश्रधातू हलका, पण मजबूत असतो. पूर्वी यासाठी टायटॅनियम, अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम इत्यादींचे मिश्रधातू आणि स्टील वापरत. आता त्यांच्या जोडीला कार्बन फायबरसारखे कृत्रिमरीत्या तयार केले जाणारे पदार्थही वापरले जातात. विमानाचा सांगाडा मध्यभागी पोकळ असतो.

आकार लांब व दोन्ही टोकांना निमुळत्या नळीसारखा असतो. पुढे टोकदार नाक, मागे निमुळते शेपूट आणि हातांच्या जागी दोन पंख! विमानाच्या मधल्या सांगाडय़ाच्या सांध्याच्या ठिकाणी पंख रुंद असतात आणि मग अरुंद होत शेवटी टोकदार होतात. थोडक्यात विमानाचा आकार पक्ष्यासारखाच असतो.

विमानाच्या पंखांची बांधणी हलता आणि स्थिर अशा दोन भागांत केलेली असते.  पंखांच्या पाठीमागच्या बाजूस पक्ष्यांच्या पिसांप्रमाणेच उघडझाप करणाऱ्या झडपा- एलरॉन्स असतात. एलरॉन्सचा उपयोग करून पंखांची गोलाई कमी अधिक करता येते. याचा उपयोग विमान वरती झेपावण्यासाठी, दिशा बदलण्यासाठी आणि विमान कमी जास्त उंचीवर नेण्यासाठी होतो. विमानाच्या शेपटीवर वर-खाली करता येतील, असे एलिव्हेटर्स असतात आणि रडारही असते.

– डॉ. सुभगा कार्लेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal how wright brothers invent the airplane zws
First published on: 17-05-2022 at 03:25 IST