शरीरात दर सेकंदाला लाखो सूक्ष्मजंतू प्रवेश करतात. ते अन्नपाण्यातून, श्वासातून, मूत्र मार्गातून शरीरात शिरतात. तरीदेखील आपण रोगविरहित जीवन जगतो. याचे श्रेय रोगप्रतिकारक्षमतेला जाते. म्हणून लुई पाश्चर म्हणतो, ‘आपण सूक्ष्मजंतूंच्या महासागरात राहत असलो तरी नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमतेचा परवाना बाळगायला हवा.’

आपल्याला जन्मजात रोगप्रतिकारक्षमतेचे कवच-कुंडल मिळालेले असते. आपल्या सर्व अवयवांभोवती त्वचा लपेटलेली असते. कातडीवर जखमा नसतील तर कातडीतून विषाणू, जीवाणूसारखे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात येऊ शकत नाहीत. नाक, तोंड, मूत्रमार्ग, योनीमार्गांतील ओलसरपणा, बुळबुळीत पदार्थ यांत सूक्ष्मजीव चिकटतात आणि सूक्ष्मजीवांची हालचाल, प्रवेश रोखला जातो. या मार्गांतील ओलसर त्वचेत, डोळ्यातील अश्रूंत ‘लायसोझाइम’सारखी विकरे असतात. ती सूक्ष्मजीवांच्या पेशी फोडून त्यांना मारतात.

जखमेतून येणारे रक्त साकळते, खपली धरते. रक्त साकळण्यापूर्वी शिरलेल्या सूक्ष्मजीवांना रक्तातील श्वेतपेशी गिळून, पचवून टाकतात. आणखी काही श्वेतपेशी जखमेच्या आसपास जंतूविरोधी रसायने निर्मून सूक्ष्मजीव नष्ट करतात. सूक्ष्मजीव रक्तातून, रसातून शरीरात पसरू लागलेच तर ठिकठिकाणी पोलीस चौक्यांप्रमाणे असणाऱ्या रसग्रंथींत सूक्ष्मजीव अडवून मारले जातात.

आपल्या शरीरात ‘लिंफ’ हा द्रवपदार्थ वाहून नेण्यासाठी लिंफॅटिक संस्था कार्यरत असते. नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमतेसाठी प्रतिद्रव्ये वाहून नेण्याचे काम ही संस्था करते. यातील लिंफ नोड्स हे एखाद्या गळणीसारखे काम करतात. यात सूक्ष्मजीव अडकतात आणि नष्ट होतात. लिंफ हा द्रव स्नायूंना ताण देणाऱ्या व्यायामाच्या माध्यमातूनच आपल्या शरीरभर वाहून नेला जातो.

न्युट्रोफिल्स, मॅक्रोफाजीस या सूक्ष्मजंतूभक्षक श्वेतपेशी खाल्लेल्या सूक्ष्मजीवांचे विघटन करून त्यातील प्रथिनरेणूंचे स्वत:च्या पेशीपृष्ठावर जणू प्रदर्शन मांडतात. त्यातून इतर पेशींना आपल्या शत्रूंचे रेणू कसे असतात हे कळते. सूक्ष्मजीवांशी चाललेल्या युद्धात ‘कोण आपला, कोण परका’ हे कळावेच लागते. ओळख न पटल्यास आपल्या भक्षकपेशी आपल्याच इतर पेशींना ठार करू शकतात. अशा रोगांना ऑटोइम्यून म्हणजे ‘स्वनाशकारक रोग’ म्हणतात.

शत्रूसूक्ष्मजीव कोणते हे लक्षात आले की त्यांच्या विरुद्ध शरीर प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार करून सूक्ष्मजीवांचा नाश घडवते. नवनव्या आणि बदलत्या रोगजंतूप्रकारांची ओळख करून घेणे, ती ध्यानात ठेवणे आणि भविष्यातील लढतींसाठी कायम तयार राहणे; हे आपल्या नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमतेचे काम आहे. अचानक झालेल्या रोगसंक्रमणात मात्र नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यास पुरेसा वेळ नसल्याने लस घेऊन या क्षमतेला कुमक पुरवावी लागते.

नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org